Nagpur Crime: नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील बोरी नाईक परिसरात मध्यरात्री सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननावर महसूल विभागाने धाडसी कारवाई केली. या कारवाई दरम्यान नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता चक्क धावत्या जेसीबीला लटकून ३ ते ४ किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. या थरारात महसूल पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला अशी तक्रार कुही पोलिस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे. या घटनेत महसूल प्रशासनाच्या पथकाने मोठ्या धैर्याने एक जेसीबी आणि दोन ट्रॅक्टर जप्त केले आहेत.
West Bengal: सुवेंदु अधिकारी यांच्या पीएची हत्या! पाठलाग करुन अडवलं, गोळ्या झाडून संपवलं
तहसीलदारांना चिरडण्याचा प्रयत्न...
समोर आलेल्या माहितीनुसार, बोरी नाईक शिवारात अवैधरित्या मुरूम उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच ५ मे रोजी रात्री ११:३० च्या सुमारास नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांनी पथकासह छापा टाकला. यावेळी घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका ट्रॅक्टर चालकाने थेट नायब तहसीलदारांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. निकाळजे यांनी बाजूला उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला, मात्र अंधाराचा फायदा घेत तो चालक पसार झाला.
याच वेळी MH40 CQ 2388 क्रमांकाचा जेसीबी वेगाने पळू लागला. निकाळजे यांनी त्याला थांबवण्याचा इशारा केला, पण चालकाने वेग अधिकच वाढवला. डगमगून न जाता निकाळजे यांनी धावत्या जेसीबीला पकडले आणि त्याला लटकले. चालकाने त्यांना खाली पाडण्यासाठी वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी झुडपांना खेटून चालवले. यामध्ये निकाळजे यांचा शर्ट फाटला आणि त्यांच्या हाताला जखमाही झाल्या. तब्बल ३-४ किलोमीटरपर्यंत मृत्यूशी झुंज देत त्यांनी आपली पकड सोडली नाही. अखेर समोरून पोलीस पथक येताना दिसताच चालकाने जेसीबी थांबवला.
7/12 Document News: सातबारा उतारा बंद, आता मिळणार 'प्रॉपर्टी कार्ड'; राज्य सरकारचा मोठा निर्णय
या कारवाईत महसूल विभागाने अवैध उत्खननात गुंतलेली जप्त केली आहेत. या मोहिमेत नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांच्यासोबत ग्राम महसूल अधिकारी मोहन पवार, आनंद मस्के, महसूल सेवक निलेश तिरपुडे आणि वेलतूर पोलीस स्टेशनचे एपीआय राऊत व त्यांचे कर्मचारी सहभागी होते. या कारवाईमुळे कुही तालुक्यातील अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.