"गई भैंस पानी में.." अशी हिंदी भाषेत लोकप्रिय म्हण आहे. त्याच धर्तीवर आता "गई मेहनत पानी में.." असे म्हणण्याची पाळी नागपूर महापालिकेवर (Nagpur Municipal Corporation) आली आहे. नागपूर शहराचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक तलाव असलेला अंबाझरी तलाव गेली कित्येक वर्षे जलपर्णी वनस्पतीच्या विळख्यात असून ही वनस्पती काढण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अलीकडेच या तलावाचा अधिकांश भाग जलपर्णी मुक्तीच्या अभियानाद्वारे जलपर्णीच्या विळख्यातून मुक्त करण्यात आल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता.
मात्र, आता या संपूर्ण अभियानाने एक भलतेच वळण घेतले आहे. जलपर्णी वनस्पती तलावातून काढून काठावर रचून ठेवण्यात आली होती. मात्र, अलीकडेच तीन दिवस सतत आलेल्या पावसाने तलावातील पाण्याची पातळी वाढली आणि त्यामुळे, काठावरील वनस्पतीचे ढिगारे पुन्हा तलावाच्या पाण्यात शिरले असून पुन्हा तलावाला जलपर्णी वनस्पतीचा विळखा बसल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे.
नक्की वाचा - Matheran : माथेरानात तोबा गर्दी, विकेंडला 50 हजारांहून अधिक पर्यटकांची हजेरी, रस्त्यावर रांगा; टॅक्सीचालक हैराण!
त्यामुळे तलावात पोहण्याच्या आशेने आलेली लहान मुले गई जलपर्णी पानी में असे गमतीने म्हणत आहेत. मुळात कोट्यवधी रुपये खर्चून काढलेली वनस्पती काठावर ढिगारे रचून ठेवणे यात कसले शहाणपण आहे की आळस हाच प्रश्न आता नागपूरकरांना पडला आहे.