नांदेड: नांदेड जिल्ह्यामध्ये घडलेल्या एका काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 16 वर्षाच्या मुलाने आपल्या वडिलांकडे नवीन मोबाईल अन् कपड्यांची मागणी केली. मात्र घरच्या गरीबीमुळे वडिलांनी त्याला थोडे दिवस थांबण्याचा सल्ला दिला. याच रागातून मुलाने आत्महत्या केली. सर्वात दुर्दैवी म्हणजे मुलाने आत्महत्या केल्याच्या धक्क्याने वडिलांनाही त्याच दोरीला गळफास घेत आयुष्य संपवले.
नांदेडच्या बीलोली तालुक्यातील मिणकी गावात राजेंद्र पैलवार हे पत्नी अन् 3 मुलांसोबत राहतात. त्यांचा एक मुलगा बारावी शिकला असून आता शेतीकाम करतो तर दुसरा अकरावीला अन् सर्वात छोटा ओमकार हा दहावीत शिकतोय. पैलवार कुटुंबाकडे केवळ 2 एकर जमीन असून तिच्यावरही कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे कुटुंबांचा गाडा चालवणे मुश्किल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अशातच बाहेरगावी आश्रमशाळेत शिकणारा ओमकार हा मकरसंक्रांत निमित्त घरी आला. घरी आल्याने ओमकार याने त्याच्या वडिलांना नवे कपडे अन् मोबाईल घेवून देण्याचा हट्ट केला. मुलाचा हट्ट पाहून बापानेही परिस्थिती नसतानाही थोडे दिवस थांबवण्याची सूचना केली. सध्या पैसे नाहीत पैसे आले की घेवून देण्याचे मान्य केले. पण यावर ओमकरचे समाधान झाले नाही.
त्याचा धीर सुटला अन् तो रागाने बाहेर गेला. संध्याकाळ झाल्यावरही ओमकार घरी परतला नाही. बापाने शोधाशोध केली पण तो आढळला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतातील झाडाला मुलाने गळफास घेतल्याचे पित्याला दिसले. ओमकार राजेंद्र पैलवार ( वय 16 वर्ष ) याचा मृत्यू झाला होता.
वडिलांनी हंबरडा फोडला. मुलाचा गळफास सोडवला पण पुढे भयानक घडल. मुलाला मायेनं जवळ घेतला. डोळ्यात अश्रू होतेच. त्यानंतर वडील राजेंद्र पैलवार यांनी तोच गळफास स्वतःच्या गळ्यात अडकवला अन् स्वतःची पण जीवनयात्रा संपवली. एकाच दोरीने बाप अन् लेकाचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ होत आहे.