योगेश लाठकर
कलियुगात माणुसकी नाहीशी झाली आहे, असे वाक्य अनेकदा आपल्या कानी पडते. अनेकदा ते खरं ही ठरतं. अशी उदाहरणे ही आपल्याला पहायला मिळतात. पण नांदेड जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेने माणुसकी अजूनही शिल्लक असल्याचा अनुभव आला. इथे रस्त्यात चिखल झाला अन् त्याच चिखलात मानसुकीचं कमळ फुललं. चिखलात एक रुग्णवाहीका अडकली होती. त्यात व्हेंटीलेटरवर ठेवलेला रुग्ण होता. मग काय सर्वांनी मिळून ही गाडी चिखलातून बाहेर काढली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नांदेड शहरात लातूर,परभणी,हिंगोली, यवतमाळ, बीड या जिल्ह्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात. नांदेडच्या खासगी रुग्णालयातील सुविधा थोड्याफार आधुनिक असल्याने मेडिकल इमरजंन्सीसाठी नांदेड गाठले जाते. असाच एक व्हेंटिलेटरवर असलेला रुग्ण लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातून ॲम्ब्युलन्सने शहरात उपचारासाठी येत होता. ही ॲम्ब्युलन्स कंधार तालुक्यातील माणसपूरी शिवारात पोहोचली.
या ठिकाणी रस्त्याचे मागील अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. या ठिकाणी माती मिश्रित मुरूम असल्याने काल झालेल्या पावसात इथे खूप मोठ्या प्रमाणात चिखल झाला. ॲम्ब्युलन्स चालकाने इथून गाडी नेत असताना ही ॲम्ब्युलन्स चिखलात फसली. त्यामुळे ट्राफीक जाम झालं. वाहनांच्या रांगा लागल्या. या ॲम्ब्युलन्स मध्ये व्हेंटिलेटरवर असलेला रुग्ण होता. ही गोष्टी ट्राफीकमध्ये अडकलेल्या वाहनधारकांना समजली. त्यानंतर ही सर्व वाहनधारक एकत्र झाले. त्यांनी या ॲम्ब्युलन्सला चिखलातून बाहेर काढण्यासाठी मदत केली.
लगोलग एक जेसीबी देखील बोलावण्यात आला. या जेसीबीचीही मोलाची मदत झाली. एका तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही ॲम्ब्युलन्स चिखलातून बाहेर पडली. त्यानंतर रुग्णालयाच्या दिशेने ती रवाना झाली. पायाला चिखल लागू नये म्हणून अनेकजण काळजी घेतात, पण या घटनेत मात्र प्रत्येकाने रुग्ण रुग्णालयात कसा लवकर पोहोचेल हिच काळजी घेतली. यात ॲम्ब्युलन्सला चिखलातून बाहेर काढताना अनेकांच्या कपड्यांना, चप्पल बुटांना चिखल लागला होता. पण सर्वांनीच त्याची तमा न बाळगता ॲम्ब्युलन्सला मदत केली.