प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात आजही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. माळ ते बियामाळ या गावांना जोडणारा रस्ता नसल्याने एका लग्नसोहळ्यात नवरदेवाला तब्बल चार किलोमीटर खांद्यावर बसवून वरात काढावी लागली. या अनोख्या वरातीची परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
परंपरा नव्हे, गावकऱ्यांसमोर मोठी अडचण...
मिळालेल्या माहितीनुसार, सातपुड्याच्या डोंगराळ भागात वसलेल्या या गावांपर्यंत वाहन पोहोचणं तर दूरच, अनेक ठिकाणी घोडाही जाऊ शकत नाही. त्यामुळे लग्न समारंभासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी नवरदेवाला खांद्यावर बसवून नेण्याची परंपरा आजही कायम आहे. ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात नवरदेवाची वरात काढली. या प्रसंगाने स्थानिक संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवले असले तरी त्यामागील रस्त्याच्या अभावाची गंभीर समस्या अधोरेखित झाली.
ग्रामस्थांनी अनेक वेळा रस्त्याची मागणी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. लग्नातील ही घटना दुर्गम भागातील विकासकामांची गरज पुन्हा एकदा अधोरेखित करणारी ठरली आहे. प्रशासनाने या गावांकडे विशेष लक्ष देऊन लवकरात लवकर रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ नागरिकांकडून केली जात आहे.