प्रशांत जव्हेरी, नंदुरबार
Sarangkheda Horse Festival: एखाद्या महागड्या आलिशान मर्सिडीजपेक्षाही महाग घोडा असेल तर? ऐकून धक्का बसेल, पण सारंगखेड्याच्या घोडेबाजारात असा एक घोडा दाखल झाला आहे. गुजरातमधून आलेला ‘ब्रम्होस' नावाचा हा घोडा तब्बल 8 कोटी रुपये किमतीचा असल्याची चर्चा असून, बाजारात त्याच्याभोवतीच गर्दी उसळली आहे.
बापरे! 8 कोटींचा घोडा
सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिव्हलमध्ये दाखल झालेला हा काळा, रुबाबदार आणि लयबद्ध चालणारा घोडा म्हणजे ब्रम्होस. कपाळावरचा आकर्षक पांढरा पट्टा आणि मारवाडी जातीची उठावदार ठेवण हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य. गुजरातच्या नागेश देसाई यांच्या देसाई स्टडफॉर्मवर पाळलेला हा घोडा आता बाजारात सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
पुष्कर बाजारात या घोड्याला 8 कोटी रुपयांपर्यंत बोली लागली होती. परंतु देसाई कुटुंब 8 कोटी किंमत असूनही ब्रम्होस विक्रीसाठी तयार नाही. 36 महिन्यांचा, तब्बल 63 इंच उंचीचा ब्रम्होस आज देशातील टॉप अश्वांपैकी एक मानला जातो.याच्या खानपानाची काळजीही तितकीच विशेष, दिवसभरात तब्बल 15 लिटर दूध, तसेच अश्वतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पौष्टिक खाद्य, देखभालीसाठी दिवसभर स्वतंत्र मजूर, मसाज, ग्रुमिंगची विशेष व्यवस्था असते.
'ब्रम्होस'ची चर्चा
त्यामुळेच देशभरात झालेल्या अनेक अश्व स्पर्धांमध्ये ब्रम्होस नंबर वन ठरला आहे. सारंगखेड्याच्या या ऐतिहासिक घोडेबाजारात यंदा ब्रम्होसने खऱ्या अर्थाने सर्वांचे लक्ष वेधले. त्याचा रुबाब, उंच किंमत आणि तुफान लोकप्रियता यामुळे हा घोडा बाजाराचा शोस्टॉपर ठरला आहे. देसाई स्टडफॉर्मवर ब्रम्होसच्या ब्लिडिंगमधून आतापर्यंत 10 पिलं तयार झाली आहेत.
(नक्की वाचा : New Labour Code: आता PF वाढला तरी काळजी नाही; कामगार मंत्रालयाकडून कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी भीती दूर )
या सर्व पिल्लांना बाजारात लाखोंच्या बोली लागल्या आहेत. म्हणूनच हा घोडा भविष्यात केवळ हॉर्स ब्रीडिंगसाठी वापरण्याचा निर्णय देसाई कुटुंबाने घेतला आहे. त्यांच्या मते, ब्रम्होस हा फक्त घोडा नाही तर एक अनमोल संपत्ती आहे.