Cold Wave Alert : पुढील दोन दिवसांत राज्यातील नागरिकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागणार आहे. उत्तरेकडून वेगाने थंड वारे वाहत असल्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये तापमान सरासरी सामान्य तापमानापेक्षा कमी नोंदवले जाईल. हवामान विभागाने पुढील 48 तासांत थंडीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला असून, खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील 14 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांवर थंडीचा परिणाम?
राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 14 जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठवाडा (Marathwada): जालना, परभणी, बीड, नांदेड आणि लातूर.
विदर्भ (Vidarbha): गोंदिया आणि नागपूर.
उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra): नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर.
पश्चिम महाराष्ट्र (West Maharashtra): पुणे आणि सोलापूर
(नक्की वाचा : New Labour Code: आता PF वाढला तरी काळजी नाही; कामगार मंत्रालयाकडून कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी भीती दूर )
थंडीच्या लाटेमुळे आरोग्यावर होणारे परिणाम
या थंडीच्या लाटेमुळे (Cold Wave) नागरिकांच्या आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
- आजारपण: फ्लू, सर्दी-पडसे (running/stuffy nose) किंवा नाकातून रक्त येणे (nosebleed) यांसारख्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जास्त वेळ थंडीत राहिल्यास हे आजार बळावतात.
- थंडी वाजणे (Shivering): शरीराची उष्णता कमी होत असल्याचे हे पहिले लक्षण आहे. थंडी वाजू लागल्यास दुर्लक्ष न करता लगेच घरात सुरक्षित ठिकाणी जावे.
- फ्रॉस्टबाइट (Frostbite): जास्त वेळ थंडीत राहिल्यास 'फ्रॉस्टबाइट' होऊ शकते. यामध्ये त्वचा फिकट, कडक आणि सुन्न पडते आणि नंतर बोटांसारख्या शरीराच्या उघड्या भागांवर काळ्या रंगाचे फोड येतात. अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.
- इतर परिणाम: शेती, पिके, पशुधन, पाणीपुरवठा, वाहतूक आणि वीज क्षेत्रावरही काही ठिकाणी परिणाम जाणवू शकतो.
( नक्की वाचा : Latur-Mumbai : लातूरहून निघा अन् 5 तासात मुंबई गाठा! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; पाहा Exclusive Video )
थंडीपासून बचाव कसा कराल?
थंडीच्या काळात प्रत्येकाने, विशेषतः श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींनी, विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
उबदार कपडे: सैल, हलके आणि उबदार लोकरीचे कपडे एकावर एक असे अनेक थर घालावेत. एका जाड कपड्याऐवजी अनेक पातळ थरांचे कपडे घाला.
शरीर झाका: डोके, मान, हात आणि पायाची बोटे पुरेशी झाकून ठेवावीत, कारण शरीरातील बहुतांश उष्णता या भागातून बाहेर पडते. इन्सुलेटेड किंवा वॉटरप्रूफ शूज वापरा.
आहार आणि पेय: व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) युक्त फळे आणि भाज्या खाव्यात. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती (immunity) टिकवून ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थ, शक्यतो गरम पाणी किंवा पेये, प्यावीत.
बाहेरील काम टाळा: शक्य असल्यास बाहेरील कामे टाळा किंवा मर्यादित ठेवा.
Cold wave very likely to prevail in isolated pockets over Madhya Maharashtra and Marathwada.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) December 11, 2025
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/5nlysXRAkL
ओले कपडे बदला: तुमचे कपडे ओले झाले असतील, तर शरीराची उष्णता टिकवून ठेवण्यासाठी ते त्वरित बदला.
शेकोटी/हीटरचा वापर: हीटर (Heater) वापरताना विषारी वायूंचा धोका टाळण्यासाठी खोलीत योग्य वायुविजन (ventilation) ठेवा. तसेच, इलेक्ट्रिकल (electrical) आणि गॅस हीटिंग (gas heating) उपकरणे वापरताना सुरक्षिततेची काळजी घ्या.
वैद्यकीय मदत: फ्रॉस्टबाइट किंवा हायपोथर्मियाने (Hypothermia) त्रस्त असलेल्या व्यक्तीला लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळवून द्या.
पशुधनाची काळजी: आपल्या पशुधनाचेही थंडीपासून संरक्षण करावे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world