प्रशांत जव्हेरी, नंदुरबार: एका बाजूला शासन रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते तर दुसऱ्या बाजूला नंदुरबार जिल्ह्यातील चांदसैली घाटात जीवघेणे खड्डे बुजवण्यासाठी एका 7 वीत शिकणारा आदिवासी विद्यार्थ्याला भीक मागावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवसिंग पावरा नावाचा हा चिमुकला शाळा सुटल्यावर याच घाटात प्रवाशांकडून मदत गोळा करून खड्डे बुजवतो आहे.
सातपुड्याच्या दुर्गम भागातून जिल्ह्याला जोडणारा चांदसैली घाट अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. या घाटातील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे अनेक अपघात झाले असून, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा रस्ता अनेक आदिवासी पाड्यांना जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणांशी जोडतो, त्यामुळे यावर नेहमीच मोठी वर्दळ असते.
Thane : घोडबंदर रोडवरील खड्डे बुजणार, वाहतूक कोंडीही सुटणार! एकनाथ शिंदेंकडून ठाणेकरांना Good News
मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवास करणे धोकादायक बनले आहे. याच घाटातून रोज शाळेत ये-जा करणारा देवसिंग पावरा या रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे होणारे अपघात जवळून पाहतो. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कोणाचाही जीव जाऊ नये या तळमळीतून त्याने एक अनोखी शक्कल लढवली. शाळा सुटल्यावर तो थेट घाटात जातो. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना हात जोडून तो खड्डे बुजवण्यासाठी मदत मागतो.
प्रवाशांनी दिलेल्या पैशांतून तो माती आणि दगड विकत घेतो आणि फावडे व टोपलीच्या मदतीने स्वतः खड्ड्यांमध्ये भरतो. देवसिंगच्या या प्रयत्नांना प्रवाशांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याच्या या कार्यामुळे रस्त्यावरील खड्डे काही प्रमाणात कमी झाले असून, अपघातांचे प्रमाणही घटले आहे. मात्र एका लहान मुलाला या रस्त्यावरती असलेले खड्ड्यांमुळे होणारे दुष्परिणामाची जाणीव आहे तरी देखील कुंभकर्णाच्या झोपेत झोपलेल्या या जिल्हा प्रशासनाला घाट रस्त्यावरती असलेले खड्डे केव्हा दिसतील असाच काहीशा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.