निलेश वाघ, प्रतिनिधी
महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व नव्यानेच रामसर दर्जा प्राप्त झालेल्या नाशिकच्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात सध्या परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे. पक्षीप्रेमींसाठी ही एक पर्वणीच मानली जाते. त्यामुळे देशभरातील पक्षीप्रेमी येथे पक्षी निरीक्षणासाठी गर्दी करत आहे. नाशिक जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी दारणा व कादवा या तीन प्रमुख नद्यांच्या संगमामुळे नांदूरमधमेश्वर धरण परिसरात निर्माण झालेल्या पाणथळाकडे दरवर्षी देशासह परदेशातील पक्षी हिवाळा सुरू की हजेरी लावतात.
विशेषत: युरोप, सायबेरिया, कजाकिस्थान, मंगोलिया यासह विविध देशातील परदेशी पाहुणे हजारो किलोमीटर प्रवास करून स्थलांतरित होतात. हिवाळ्यात नांदूरमधमेश्वर येथे पक्षांचं जागतिक संमेलनच भरल्याचा अनुभव घेता येतो.
मन मोहून टाकणाऱ्या रंग संगती, कानाला मंजुळ वाटणारे विविध आवाज, पक्षांचे थवे आणि कडाक्याची थंडी असे काहीसे आगळे वेगळे वातावरण सध्या नांदूरमधमेश्वर पाहायला मिळत आहे. या ठिकाणी असलेल्या पाणथळातील अन्न खाण्यासाठी हिवाळ्यात परदेशातून पक्षी दाखल झाले आहे. नांदूरमधमेश्वर येथे जवळपास 272 पेक्षा अधिक जातींच्या पक्ष्यांची दर्शन होते.
अनेक पक्षी पुस्तकात पाहिलेले असतात मात्र तेच पक्षी येथे प्रत्यक्षात अनुभवायला मिळतात. त्यामुळे बच्चे देखील खुश होतात. अभयारण्याला भेट देण्यासाठी देशभरातील पक्षीमित्रांसह पर्यटकांची अक्षरक्षः रीघ लागली असून या पक्षांचे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहे व पक्षी बघण्याचा आनंद घेत आहे. वन विभागाकडून या ठिकाणी पक्षी प्रेमी व पर्यटकांसाठी उत्तम व्यवस्था व सुविधाही पुरण्यात येतात.
निसर्गरम्य असलेले नांदूरमधमेश्वर धरण, पौराणिक मंदिरे, मळे तसेच अनेक मन मोहून टाकणारे पर्यटन केंद्र या परिसरात आहे. त्यात परदेशातील पक्षी पाहुण्यांची भर पडत आहे.