उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात ते 100 पेक्षा अधिक दिवस तुरुंगामध्ये होते. तुरुंगात त्यांना काय दिसले याबद्दल त्यांनी 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकात विस्ताराने लिहिले आहे. या पुस्तकाचे नाव हे कसे मिळाले हे देखील त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे. या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी चौकशी सुरू झाल्यापासून तुरुंगातून बाहेर येईपर्यंत विविध घटनांबद्दल लिहिले आहे.
संजय राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकात 'आतली माणसे' नावाने एक प्रकरण आहे. यामध्ये त्यांनी तुरुंगात भेटलेल्या काही व्यक्तींची माहिती दिली आहे. संजय राऊत यांना तुरुंगामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख, निहाल गरवारे, प्रवीण राऊत, गिरीश चौधरी, राकेश आणि सारंग वाधवान, अविनाश भोसले अशी माणसे भेटली होती. यातल्या अनिल देशमुखांशी आर्थर रोड तुरुंगात गेल्याच्या पहिल्याच दिवशी भेट झाली होती असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
अनिल देशमुख यांचा स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यालाही अटक करण्यात आली होती आणि तो देखील देशमुखांसोबत आर्थर रोड तुरुंगामध्ये होता. हा कुंदन शिंदे आपला केअरटेकर बनला होता असे राऊत यांनी म्हटले आहे. पिण्याच्या पाण्यापासून खाण्यापर्यंत आणि औषधांपर्यंत कुंदनने खूप मदत केल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी म्हटले आहे की तुरुंगामध्ये गरवारे उद्योगसमूहाचे निहाल गरवारे देखील होते. मनी लाँड्रींग प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. गरवारे हे जम्मू कश्मीर बँकेचे संचालक असताना त्यांनी आर्छिक गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
तुरुंगातील आरोपीने दिले नाव
संजय राऊत यांची तुरुंगामध्ये उद्योगपती अविनाश भोसले यांच्याशी ओळख झाली होती. भोसले हे तुरुंगातील मोऱ्यांमुळे त्रस्त झाले होते. एकदा त्यांच्याशी सुरू असलेल्या संभाषणादरम्यान संजय राऊत यांनी मला पुस्तक लिहावेसे वाटत असल्याचे म्हटले होते. यावर भोसले यांनी 'लिहा' असे म्हटले. यावर भोसले यांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला होता की, पुस्तकाला नाव काय द्यायचे ? त्यावर संजय राऊत यांनी ते नंतर ठरवू असे म्हटले होते. त्यांचे बोलणे पूर्ण होताच भोसले यांनी "नरकातला स्वर्ग!" असे शब्द उच्चारले होते. तेच नाव संजय राऊत यांनी पुस्तकासाठी निश्चित केले.