प्रांजल कुलकर्णी, प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा फटका बसलाय. नाशिक जिल्ह्यातही गेल्या आठ दिवसांपासून या पावसानं थैमान घातले. शेतीपिकं धोक्यात आली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दरम्यान एकीकडे ही परिस्थिती असतांनाच दुसरीकडे नाशिकच्या दुगाव फाटा परिसरात राहणाऱ्या सूरज थेटे या तरुण शेतकऱ्याचे 3 एकरवरील टोमॅटो पूर्णपणे सुरक्षित आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
थेटे यांच्या शेतामधील टोमॅटो पिकाला पावसाचा कोणताही फटका बसलेला नाही आणि ह्याला कारण ठरलय ते म्हणजे थेटे यांनी लढवलेली एक अनोखी शक्कल....नाशिकमध्ये यावर्षी उन्हाचा कडाका अधिक आहे. यंदा पारा 41 अंशांपर्यंत जाऊन पोहोचल्याने पिकांना सरंक्षण देण्यासाठी थेटे यांनी त्यांच्या 1 एकरवरील द्राक्षांना पॉलिथिलीन कापडाचे शेडनेट उभारले होते.
याच शेडनेटचा फायदा त्यांना या अवकाळी पावसादरम्यानही झाल्याने त्यांनी द्राक्षांपाठोपाठ थेट 3 एकर टोमॅटोलाही या शेडनेटचा आधार दिला. यासाठी त्यांना मजुरीसह एकरामागे 50 हजारांचा खर्च आला असून पुढील 5 वर्ष या शेडनेटचा त्यांना फायदा होणार आहे.
( नक्की वाचा : Rain Update : अवकाळी पावसाचा राज्यातील 21 जिल्ह्यांना फटका, प्राथमिक अहवालातून आली काळजीची बातमी )
काय आहे पद्धत?
या संपूर्ण पद्धतीची माहिती सूरज शेटे यांनी 'NDTV मराठी' ला दिली. शेटे म्हणाले की, 'आम्ही गेल्या 4 वर्षांपासून उन्हाळी टोमॅटो करतोय. यावर्षी तापमान जास्त असल्यानं आम्ही शेडनेट टाकण्याचा विचार केला. टोमॅटोचा उन्हापासून बचाव करणे हा त्याचा उद्देश होता. शेडनेट टाकल्यामुळे प्लॉटच्या वाट्या कमी झाल्या आहेत. प्लॉटवर ताण होत नाही. टोमॅटोची सेटिंग चांगल्या प्रकारे होते.
आम्हाला पावसामध्येही याचा फायदा झालाय. आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय. या भागात टोमॅटो पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आमच्या पिकाला काहीही धोका झालेला नाही. आमचं पिक चांगल्या प्रकारे आहे. आठ ते दहा दिवसांमध्ये टोमॅटोची काढणी सुरु होईल. टोमॅटोला चांगला भाव मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.