प्रांजल कुलकर्णी, नाशिक : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याला सांगली कारागृहात नेताना महामार्गावरील ढाब्यावर मटन पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आरोपीसोबत केलेल्या मटन पार्टीनंतर राज्याच्या पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून आरोपींसोबत पार्टी केल्यानंतर पोलीस कर्मचारी थेट सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांना आरोपींसोबत केलेली पार्टी चांगलीत महागात पडली आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपींसोबत पार्टी केल्याचा ठपका ठेवत तीन पोलिसांना थेट सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पडमसिंह राऊळ,विकी चव्हाण,दीपक जठार या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
शनिवारी दुपारी नाशिक जिल्हा न्यायालयातून मध्यवर्ती कारागृहात जातांना रस्त्यात उपनगर हद्दीत एका हॉटेलवर थांबून पोलिसांनी ही पार्टी केली होती. विध गुन्ह्यातील दोन आरोपींसोबत मुख्यालयातील चार पोलीस या पार्टीमध्ये सहभागी होती. थेट पोलीस आयुक्तांना पार्टीची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाकडून हॉटेलवर छापा टाकत ही पार्टी उधळून लावली होती.
( नक्की वाचा : Exclusive: काश्मीरला जा, फोटो घे... ISI एजंट आणि हेर यांच्यात काय झाली चर्चा? )
खूनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींसोबत पोलीसांनी पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत या चारही पोलीस कर्मचाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर पडमसिंह राऊळ,विकी चव्हाण,दीपक जठार या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी की मोठी कारवाई केली आहे.