रेवती हिंगवे, पुणे: नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केल्यानंतर देशभरात राजकारण तापू लागले आहे. एकीकडे ईडीच्या या चार्जशीटविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असतानाच आज पुण्यामध्ये भाजपनेही आंदोलन केले. यावेळी काँग्रेस अन् भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे नाव आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांना नोटीस आल्यानंतर खडकी रेल्वे स्थानकात युवक काँग्रेसकडून रेल्वे रुळावर आंदोलन करण्यात आले यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुणे- लोणावळ लोकल अडवून धरली.
अशातच आज पुण्यामध्ये काँग्रेस भवनाच्यासमोर भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्ते हे पुण्यातील काँग्रेस भवनावर धडकणार होते. सोनिया गांधी- राहुल गांधी यांना अटक करा अशा घोषणा करत काँग्रेस भवनामध्ये आम्ही जाणारच.. असा आक्रमक पवित्रा भाजपच्या आंदोलकांनी घेतला. दुसरीकडे काँग्रेसनेही भाजपच्या आंदोलनाला प्रत्यूत्तर म्हणून लाठ्याकाठ्या घेऊन काँग्रेस भवनासमोर ठाण मांडले. त्यामुळे परिसरात मोठा तणाव झाल्याचे पाहायला मिळाले.
( नक्की वाचा : Tanisha Bhise Case : दीनानाथ मंगेशकर नाही तर 'या' दोन हॉस्पिटलवर ससूनच्या अहवालात ठपका )
यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत भाजप कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यामुळे पुण्यातील बालगंधर्व चौकात मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, भाजपच्या या आंदोलनानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनीही आक्रमक भूमिका घेत भाजप कार्यालयावर आंदोलनाची तयारी केली. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात चालवलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज काँग्रेसने निदर्शने केली. ही कारवाई मोदी सरकार सूडबुद्धीने करीत असून, देशातील ज्वलंत प्रश्नांकडे लोकांचे लक्ष जाऊ नये, यासाठी हे सगळे कारस्थान रचले जात आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करीत असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.
(नक्की वाचा- नाशिक हिंसाचार प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर, MIM च्या शहराध्यक्षासह 38 जणांना अटक)