प्रसाद शिंदे, प्रतिनिधी
Navratri 2025: नवरात्रीला आता सर्वत्र सुरुवात झाली आहे. या काळात सर्वत्र देवीचा जागर केला जातो. राज्यात देवीची अनेक मंदिरं प्रसिद्ध आहे. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहुरची रेणुका देवी, वणीची सप्तश्रृंगी देवी ही मंदिरं सर्वांना माहिती आहेत. या मंदिरात दर्शनासाठी नवरात्रात मोठी गर्दी असते. पण, राज्यातील तब्बल 1100 वर्ष जुने देवीचे मंदिर तुम्हाला माहिती आहे का? हे मंदिर ज्या गावात आहे त्या गावाला तुळजाभवानीचे माहेरघर मानले जाते. हे मंदिर कुठं आहे? त्याचा इतिहास काय? तेथील परंपरा काय आहेत? ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अहिल्यानगर शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बुऱ्हानगर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे माहेरघर मानले जाते. या ठिकाणी आई तुळजाभवानी बालरूपामध्ये प्रकट झाल्या होत्या. त्यामुळे तुळजापूर हे सासर तर बुऱ्हानगर हे माहेर मानले जाते. या बालस्वरूपामुळे देवीला ‘अंबिका देवी' असेही म्हटले जाते.
मंदिराचा इतिहास आणि परंपरा
आई तुळजाभवानी बालरूपामध्ये भगत कुटुंबाकडे तब्बल 12 वर्षे वास्तव्यास होत्या. त्यानंतर भगत कुटुंबाचे प्रमुख लहानू भगत यांनी स्वतःची जमीन आणि शेती विकून मंदिराची निर्मिती केली. या मंदिराला सुमारे 1100 वर्षांची प्राचीन परंपरा आहे. सध्या भगत कुटुंबाची 30 वी पिढी या मंदिराची पूजा-अर्चा आणि व्यवस्थापन सांभाळत आहे. भविष्यात किसन भगत, अर्जुन भगत आणि विजय भगत यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. सध्या मंदिराची धुरा ॲडव्होकेट अभिषेक भगत सांभाळत आहेत.
( नक्की वाचा : Navratri 2025: नवरात्रीसाठी मोफत स्टिकर्स हवेत? Gemini, ChatGPT नं 5 मिनिटात बनवा, वाचा 10 सोपे प्रॉम्प्ट्स )
कधी भरते यात्रा?
बुऱ्हानगर येथे गेल्या 1,100 वर्षांपासून मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मानाच्या घटांची व धर्मध्वजांची गावातून पारंपरिक मिरवणूक काढली जाते. दुपारी 12 वाजता मंदिरामध्ये विधिवत घटस्थापना केली जाते. नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला येथे पलंग पालखीची मिरवणूक काढली जाते. ज्याप्रमाणे तुळजापूरमध्ये तिसऱ्या माळेला यात्रा भरते, त्याचप्रमाणे बुऱ्हानगरमध्येही मोठी यात्रा भरते.
जे भाविक तुळजापूरला जाऊ शकत नाहीत, ते मोठ्या संख्येने बुऱ्हानगर येथील मंदिरात दर्शनासाठी येतात. येथे दररोज सकाळी देवीचा शृंगार आणि महाआरती केली जाते, तर रात्री 10 वाजता शेजारती होते. नवरात्रोत्सवात अष्टमीला होमहवन केले जाते. विजयादशमीला महापूजा आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेलाही महापूजा संपन्न होते. दुसऱ्या दिवशी छबिण्याची मिरवणूक काढून महाप्रसादाचे वाटप केले जाते. नवरात्रोत्सवादरम्यान, भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी भगत कुटुंबाकडून योग्य व्यवस्था केली जाते. तसेच, सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त आणि 25 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतात.
नवमीच्या रात्री आणि विजयादशमीच्या पहाटे बुऱ्हानगर येथील पालखी तुळजापूर येथे पोहोचते. येथे भगत कुटुंबीयांकडून देवीच्या विविध विधी, धार्मिक कार्यक्रम आणि सीमोल्लंघनाचा कार्यक्रम केला जातो. त्यानंतर पालखीतून देवीला बसवून मंदिर प्रदक्षिणा केली जाते.