- NCERT ने इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा काढला आहे
- हा निर्णय शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात वाद निर्माण करत असून छत्रपती घराण्याने त्यावर तीव्र निषेध केलाय
- छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे
राहुल तपासे
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (NCERT) इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात वादाचे वादळ निर्माण झाले आहे. छत्रपती घराण्याने यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. देशाच्या शैक्षणिक क्षेत्रातील एका मोठ्या निर्णयामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. NCERT ने इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा काढून टाकला आहे. या निर्णयामुळे शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज एकेकाळी अटकेपार फडकला होता. विशेषतः राजस्थानमधील मोहिमा आणि तिथल्या विजयामुळे मराठा साम्राज्याच्या सीमा विस्तारल्या होत्या. हा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांसमोर असणे आवश्यक असताना, NCERT ने नकाशा हटवल्याने हा इतिहास पुसण्याचा कट असल्याचे बोलले जात आहे. कोणाला वाटले म्हणून इतिहास पुसला जात नाही किंवा बदलला जात नाही. कुणाच्या दबावाने हा नकाशा गायब करण्यात आला असा सवाल छत्रपती घराण्यातील वृषालीराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. नव्या पिढी समोर खरा इतिहास येणे गरजेचे आहे असं ही त्या म्हणाल्या.
छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. "मराठा साम्राज्य हा केवळ इतिहास नसून आमचा स्वाभिमान आहे. राजस्थानमधील विजयाची वस्तुस्थिती नाकारणे चुकीचे आहे. कोणत्याही दबावाखाली इतिहास बदलला जाऊ नये," असे त्यांनी स्पष्ट केले. अनेक राजपूत राजांनी मराठांचे साम्राज्य स्विकारले होते. ही वस्तूस्थिती आहे. ती कुणी ही बदलू शकत नाही. असं असताना हा इतिहास बदलण्यासाठी कुणाचा दबाव आहे अशी विचारणा त्यांनी केली. या प्रकरणी कायदेशीर बाबी तपासून पुढील पाऊल उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठा साम्राज्याचा विस्तार हा भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो. राजस्थानमधील अनेक राजपूत राजांनी मराठ्यांचे वर्चस्व मान्य केले होते, हा इतिहास जगासमोर आहे. मात्र, हाच नकाशा अभ्यासक्रमातून बाद केल्याने विद्यार्थ्यांपर्यंत खरा इतिहास पोहोचणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आठवीच्या इतिहास पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा काढण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयावर छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेत तीव्र निषेध नोंदवला आहे. मराठा साम्राज हा फक्त इतिहास नाही तर स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, राष्ट्र-रक्षणाचा जिवंत वारसा आहे असं ही त्या म्हणाल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world