रामराजे शिंदे, दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, देशाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषीमंत्री, पद्मविभूषण शरद पवार यांचा आज वाढदिवस. शरद पवार यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला त्यांच्या दिल्लीमधील जनपथ-6 या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या संसदेचे अधिवेशन सुरु असल्याने शरद पवार हे दिल्लीमध्ये आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवारही राजधानी दिल्लीमध्येच आहेत. आज शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून राष्ट्रवादीचे नेते दिल्लीमध्ये दाखल होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
नक्की वाचा - बसमध्ये बिघाड नाही, चालकानं मद्यपान केलं नव्हतं; कुर्ला डेपोजवळच सुरू झालं होतं अपघाताचं सत्र?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार, खासदार सुनिल तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ आदी नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आज सकाळीच अजित पवार यांनी सोशल मीडियामधून शरद पवार यांना वाढदिवसाच्या तसेच त्यांच्या दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर ते थेट शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.
तत्पुर्वी, दिल्लीमध्ये राज्यभरातील नेते, राष्ट्रवादीचे खासदार यांच्या उपस्थितीत शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एनसीपी पक्षाचे कार्यकर्ते दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी पोहोचले आहेत. शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर शुभेच्छाचे मोठे पोस्टरही लागले आहेत.
दरम्यान, या भेटीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना या भेटीबाबत खुलासा केला. साहेबांचा आज वाढदिवस होता. उद्या काकींचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. चहा-पानी झाला. मंत्रिमंडळ बैठकीबाबत चर्चा झाली. ही कौटुंबिक भेट होती. विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली.असं अजित पवार म्हणाले. तसेच राजकारणापलिकडेही काही संबंध असतात. मी घरचाच आहे, मी कुठे बाहेरचा आहे का? असा सवालही अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
नक्की वाचा - New RBI Governor : रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर Sanjay Malhotra कोण आहेत?