शरद सातपुते, सांगली
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अरबी समुद्रातील पुतळ्याचा मुद्दा संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 2016 रोजी अरबी समुद्रात स्मारकाचं जलपूजन करण्यात आलं होतं. मात्र 8 वर्ष होऊनही अद्याप काम सुरु झालेलं नाही. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
सरदार वल्लभाई पटेल यांच्यापेक्षा देशात कुठलाही पुतळा मोठा होऊ नये असं ठरलं असेल. आमचं सरकार आलं की आम्ही यात लक्ष घालू, अशा शब्दात जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.
जयंत पाटील यांनी म्हटलं की, शिवस्मारकाची जागा मीच शोधून काढली आहे. म्हणजे मी त्या समितीचा अध्यक्ष होतो. त्याच जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केलं होतं. मात्र अद्याप काहीही झालेलं नाही. त्याचं डिझाईन महाराष्ट्र सरकारने बदललं. जे पूर्वीचं डिझाईन होतं ते अतिशय उत्तम आणि टेक्निकली फिट होतं. मात्र ते डिझाईल बदलून सरदार पटेल यांच्या पुतळ्य़ापेक्षा शिवरायांचा पुतळा व्हावा, असं काम त्यावेळी महायुती सरकारने केलं. आता आमचं सरकार आलं की आम्ही त्यात लक्ष घालू, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- बच्चू कडूंच्या प्रहारचा आमदार शिवसेनेच्या गळाला; पक्षप्रवेशाची तारीखही ठरली)
छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेली भूमिका योग्यच असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा उभारायचा होता, तो उभारला नाही, आणि जो उभारला गेला तो पडला. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या विचाराने हे सरकार चालत नाही हे स्पष्ट झाले आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
(नक्की वाचा - डोंबिवलीत ट्वीस्ट! शिंदेंचा मोहरा ठाकरेंच्या गळाला, भाजपचे टेन्शन वाढले?)
संभाजीराजे बरोबर बोलत आहेत. एवढी वर्ष झाली तरी त्यांना पुतळा उभा करता आला नाही. सिंधुदुर्गात जो पुतळा उभा केला तोही पडला. त्यामुळे शिवाजी महाराज यांच्या विचाराने हे सरकार चालत नाही हे स्पष्ट असल्याचंही जयंत पाटील म्हणाले. संभाजीराजे यांनी आज अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारकाचं जलपूजन झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. मात्र स्मारक कुठेही दिसलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यावरून राजकीय वादंग उठलं असताना जयंत पाटील यांनीही सरकारवर आरोप केले आहेत.