अमेरिकेत मृत्यूशी झुंज देणाऱ्या लेकीला भेटण्यासाठी साताऱ्यात राहणाऱ्या पालकांना मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नसल्याचं समोर आलं आहे. साताऱ्याच्या उंब्रज गावातील नीलम शिंदे ही 35 वर्षीय विद्यार्थिनी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये शिक्षण घेत आहे. 11 दिवसांपूर्वी तिचा अपघात झाला. तिच्यावर अमेरिकेतील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातात दोषी असलेल्या कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र नातेवाईक आल्याशिवाय गुन्हा दाखल होत नसल्याचं अमेरिकेतील पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
नीलमच्या हाता-पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ती सध्या कोमात आहे. तिला तातडीने भेटण्यासाठी पालकांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून व्हिसासाठी संपर्क केला. मात्र मुंबईच्या पासपोर्ट व्हिसा ऑफिसला भेट देऊनही दाद मिळत नसल्यानं पालक हवालदिल झाले आहेत.
नक्की वाचा - Pune Swargate Crime : पुण्यातील बड्या नेत्याचा कार्यकर्ता? पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपीचं भयंकर रुप समोर
अमेरिकेत राहणाऱ्या नीलम शिंदे या 35 वर्षीय विद्यार्थिनीचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. 14 फेब्रुवारी रोजी वॉक करीत असताना एका चारचाकी गाडीने तिला मागून जोरदार धडक दिला. या रस्ते अपघातात ती जबर जखमी झाली. तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. या अपघातात नीलमच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. त्यामुळे ती सध्या कोमात आहे. याबाबत नीलमच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी लेकीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुंबईतील कुर्ला येथे पासपोर्ट व्हिसा ऑफिसला पालक गेले तरीही यांना दाद मिळेना असं या मुलीच्या पालकांचे सांगणे आहे.
दरम्यान सुप्रिया सुळे यांनी नीलम शिंदे हिच्या आई-वडिलांना अमेरिकन व्हिसा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने मदत करावी असं आवाहन केलं आहे.