Akola News: NEET पेपरफुटीचे धागेदोरे अकोल्यात; आरसीसीच्या शिक्षकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

NEET Paper Leak: नीट-युजी 2026 पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अकोल्यापर्यंत पोहोचले असून शहरात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
NEET Paper Leak: यावेळी आंदोलकांनी संबंधित शिक्षकाला ताब्यात घेऊन थेट सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात नेले.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

NEET Paper Leak: नीट-युजी 2026 पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अकोल्यापर्यंत पोहोचले असून शहरात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. अकोल्यातील प्रसिद्ध आरसीसी (RCC) म्हणजेच रेणुकाई कोचिंग क्लासेसविरोधात विविध संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून एका शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आरसीसीचे संचालक शिवराज मोटेगावकर यांची चौकशी केल्यानंतर अकोल्यात वातावरण तापले आहे. वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी तोष्णीवाल लेआऊटमधील आरसीसी शाखेवर धडक देत जोरदार निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी संबंधित शिक्षकाला ताब्यात घेऊन थेट सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात नेले. पेपरफुटीच्या या गंभीर प्रकरणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Advertisement

आरसीसी शाखा सील करून चौकशी करण्याची मागणी

आंदोलकांनी केवळ निदर्शनेच केली नाहीत, तर आरसीसीची अकोल्यातील शाखा तातडीने सील करण्याची आग्रही मागणी केली आहे. संस्थेचा परवाना, आर्थिक व्यवहार आणि संचालकांचे संबंध यांची सखोल चौकशी व्हावी, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली आहे. 

तपास पूर्ण होईपर्यंत या शाखेचे सर्व शैक्षणिक उपक्रम बंद ठेवण्यात यावेत, जेणेकरून पुराव्यांशी छेडछाड होणार नाही, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या आंदोलनाचे नेतृत्व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष धीरज इंगळे यांनी केले.

( नक्की वाचा : NEET Paper Leak : नीट गैरप्रकारात पुण्यातील 5 प्राध्यापक CBI च्या रडारवर; कोचिंग सम्राटांचे कनेक्शन उघड )

पालकांमध्ये संतापाची लाट

यापूर्वी मनसे विद्यार्थी आघाडी, संभाजी ब्रिगेड आणि सम्राट अशोक सेना यांसारख्या संघटनांनीही या क्लासेसवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. लाखो रुपयांची फी भरूनही जर अशा प्रकारे पेपरफुटीचे गैरप्रकार घडत असतील, तर मुलांच्या भविष्याचे काय, असा सवाल पालक विचारत आहेत. क्लासेसचे कामकाज छुप्या पद्धतीने किंवा दुसऱ्या नावाने सुरू राहू नये, यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे आणि महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. सध्या सिव्हिल लाईन पोलीस या प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडत असून, या तपासात अकोल्यातून नेमकी काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

( नक्की वाचा : NEET Paper Leak : पतीच्या फोनचा वापर अन् चॅटिंग डिलीट; पुरावे मिटवण्यासाठी मनिषा हवालदारने वापरली 'ही' शक्कल )

Topics mentioned in this article