NEET Paper Leak : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य आणि डॉक्टरांचे स्वप्न ठरवणाऱ्या 'नीट' (NEET) वैद्यकीय प्रवेश परीक्षेबाबत आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक गौप्यस्फोट NDTV मराठी करत आहे. 3 मे रोजी झालेली नीटची परीक्षा पेपर लीक झाल्यामुळे रद्द करण्यात आली असून ती आता 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार आहे. या पेपर फुटीचा मास्टरमाईंड नाशिकमधून अटक करण्यात आलेला शुभम खैरनार असल्याचा संशय असून सीबीआय त्याची चौकशी करत आहे. मात्र, या सगळ्या प्रकरणाच्या मागे एक धक्कादायक आणि तितकेच हादरवणारे नेटवर्क कसे कार्यरत होते, याची इनसाईड स्टोरी एका थेट विद्यार्थ्याच्या मुलाखतीमधून उघड झाली आहे. आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी घेतलेल्या या विशेष मुलाखतीने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
मार्गदर्शकानेच उघड केले पेपर फुटीचे बिंग
दीपक पाटील हे स्वतः नीट परीक्षा उत्तीर्ण झाले असून सध्या डॉक्टरकीचे शिक्षण घेत आहेत. ते नवीन विद्यार्थ्यांना नीट परीक्षेसाठी मार्गदर्शनही करतात. यंदाचा पेपर किती कठीण आहे आणि त्याचा पॅटर्न कसा बदलला आहे, हे स्वतः अनुभवण्यासाठी त्यांनी यंदाची नीटची परीक्षा दिली होती.
परीक्षा संपल्यानंतर त्यांनी एका विद्यार्थ्याशी सहज गप्पा मारल्या आणि त्या गप्पांमधून जे सत्य समोर आले, त्याने दीपक पाटील यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
( नक्की वाचा : NEET Paper Leak: बाप आरोपी अन् घरात 5-5 डॉक्टर; नीट पेपर लीक प्रकरणातील 'या' कुटुंबाचं धक्कादायक वास्तव )
पँटच्या खिशातून काढली सकाळीच मिळालेली उत्तरे
दुपारी 5 वाजता पेपर संपल्यानंतर दीपक पाटील यांनी ज्या विद्यार्थ्याशी संवाद साधला, त्याने अत्यंत धक्कादायक माहिती दिली. त्या विद्यार्थ्याला परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा सकाळीच पेपरमधील उत्तरे मिळाली होती. त्याने आपल्या पँटच्या खिशातून ती कॉपी काढून दीपक पाटील यांना दाखवली.
जेव्हा पाटील यांनी ती उत्तरे तपासली, तेव्हा मुख्य पेपरमधील जवळपास सगळी उत्तरे त्या कॉपीशी मिळतीजुळती होती. म्हणजेच परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर पूर्णपणे फुटला होता, यावर या घटनेने शिक्कामोर्तब केले.
( नक्की वाचा : NEET Paper Leak : रात्री 11 चा 'तो' मेसेज अन् संपूर्ण 'नीट' परीक्षा रद्द! हॉस्टेल मालकाने नेमकं काय पाहिलं? )
टेलिग्रामवर होते पेपरचे 'रेटकार्ड' आणि पासवर्ड
या धक्कादायक अनुभवानंतर दीपक पाटील यांनी परीक्षा संपल्या संपल्या म्हणजेच दुपारी 5.10 वाजता इन्स्टाग्रामवर एक सविस्तर पोस्ट टाकली. हा सगळा काळाबाजार टेलिग्राम या सोशल मीडिया ॲपद्वारे कसा सुरू होता, याचा पर्दाफाश त्यांनी केला.
परीक्षा संपायच्या 1 ते 2 महिने आधी या फुटलेल्या पेपरची किंमत तब्बल 20 ते 25 लाख रुपये इतकी अवाढव्य होती. मात्र, जशी परीक्षा जवळ आली, तसा हा रेट थेट 70 ते 80 हजार रुपयांपर्यंत खाली आला होता.
टेलिग्रामवरच यासाठीचे स्कॅनर कोड देण्यात आले होते. पेपर हवा असल्यास 30 हजार रुपये ॲडव्हान्स आणि पेपर झाल्यानंतर उरलेले 70 हजार रुपये द्यायचे, असा रेट ठरला होता. पेपरची एक पीडीएफ फाईल टेलिग्रामवर शेअर केली जात होती, ज्या फाईलला पासवर्ड होता. पैसे पाठवल्यानंतरच ग्राहकांना तो पासवर्ड दिला जात होता.
( नक्की वाचा : NEET paper leak : नाव मेडिकलला, पण कनेक्शन पेपर लीकच्या टोळीशी! नाशिकच्या शुभम खैरनारची 'कुंडली' आली समोर )
300 हून अधिक विद्यार्थ्यांनी साधला संपर्क
दीपक पाटील यांनी इन्स्टाग्रामवर टाकलेली ही पोस्ट अत्यंत वेगाने व्हायरल झाली आणि ती जवळपास 20 ते 25 लाख लोकांपर्यंत पोहोचली. या पोस्टनंतर देशभरातून अंदाजे 200 ते 300 विद्यार्थ्यांनी दीपक पाटील यांच्याशी थेट संपर्क साधून पेपर फुटल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. यामध्ये एका विद्यार्थिनीने पाटील यांना फोन करून सांगितले की, तिने लीक झालेला पेपर मिळवण्यासाठी तब्बल 50 हजार रुपये दिले होते.
या संपूर्ण साखळीमध्ये केवळ पेपर लीक झाला नाही, तर मोठ्या प्रमाणावर फसवणूकही झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्यात आले, मात्र त्यांना ऐनवेळी भलताच म्हणजेच खोटा पेपर देऊन त्यांची फसवणूक करण्यात आल्याचेही दीपक पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. या सर्व प्रकारामुळे आता संपूर्ण नीट परीक्षेच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सीबीआय या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world