NEET Paper Leak 2026: एकीकडे देशभरातील लाखो विद्यार्थी नीट परीक्षेसाठी रात्रंदिवस अभ्यास करत होते, तर दुसरीकडे राजस्थानमधील एका हॉस्टेल मालकाच्या मोबाईलवर काही तासांपूर्वीच 'गुपित' प्रश्नपत्रिका येऊन धडकली होती. सुरुवातीला एक सामान्य 'गेस पेपर' वाटणारी ही फाईल अखेर संपूर्ण देशातील परीक्षा रद्द करण्यास कारणीभूत ठरली. राजस्थानमधील सीकर येथील एका हॉस्टेल मालकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळेच नीट पेपर लीकचे हे अक्राळविक्राळ जाळे उघड झाले असून, याचे धागेदोरे आता थेट महाराष्ट्रातील नाशिकपर्यंत पोहोचले आहेत.
कधी झाली सुरुवात?
या प्रकरणाची सुरुवात 2 मे रोजी रात्री 11 वाजता झाली. केरळमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या सीकरच्या एका विद्यार्थ्याने आपल्या वडिलांना व्हॉट्सॲपवर एक पीडीएफ फाईल पाठवली. या विद्यार्थ्याचे सीकरमध्ये कोचिंग घेणाऱ्या मुलांसाठी हॉस्टेल चालवतात. मुलाने संदेश पाठवला की, हॉस्टेलमधील कोणी विद्यार्थी नीटची परीक्षा देत असेल, तर त्याला हा 'गेस पेपर' मदतीचा ठरू शकतो. मात्र, हॉस्टेल मालक रात्री लवकर झोपले असल्याने त्यांनी तो संदेश पाहिला नाही.
शिक्षकाच्या एका संशयाने धाबे दणाणले
दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्टेल मालकाने त्यांच्या हॉस्टेलमधील 4 मुलींना हा पेपर देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या आधीच परीक्षा केंद्रावर गेल्या होत्या. कुतूहल म्हणून त्यांनी हा पेपर ओळखीच्या एका केमिस्ट्री शिक्षकाला दाखवला. परीक्षा संपल्यानंतर जेव्हा या शिक्षकाने मूळ प्रश्नपत्रिका आणि व्हॉट्सॲपवर आलेला पेपर यांची तुलना केली, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
केमिस्ट्रीच्या 108 प्रश्नांपैकी 45 प्रश्न जसेच्या तसे होते. त्यानंतर बायोलॉजीच्या शिक्षकांनी तपासणी केली असता, 204 पैकी तब्बल 90 प्रश्न मॅच झाले. एकूण 135 प्रश्न हुबेहूब आल्याचे पाहून हा 'गेस पेपर' नसून पेपर लीक असल्याचे स्पष्ट झाले.
( नक्की वाचा : NEET paper leak : नाव मेडिकलला, पण कनेक्शन पेपर लीकच्या टोळीशी! नाशिकच्या शुभम खैरनारची 'कुंडली' आली समोर )
पोलिसांचा नकार आणि एनटीएची एन्ट्री
हॉस्टेल मालक आणि शिक्षकाने तातडीने स्थानिक सीकर पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, आश्चर्य म्हणजे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. परीक्षा संपल्यावर तक्रार का करत आहात, असा उलट प्रश्न पोलिसांनी त्यांना विचारला. पोलीस ऐकत नाहीत हे पाहून त्यांनी थेट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएला ईमेल केला.
ईमेलची दखल घेत एनटीएने इंटेलिजन्स ब्युरोला कळवले आणि 8 मे रोजी राजस्थानच्या एसओजीला तपासाचे आदेश दिले. एसओजीने हॉस्टेल मालकाचा फोन तपासला असता, सर्व घटनाक्रम खरा असल्याचे सिद्ध झाले.
( नक्की वाचा : Nagpur News : जेवणात विभूती आणि महाराजांकडे राहण्याची सक्ती, नागपूरच्या इंजिनियर तरुणीच्या मृत्यूचे कारण उघड! )
नाशिकच्या शुभम खैरनारपर्यंत पोहोचले धागेदोरे
तपासाचे चक्र फिरू लागले आणि जयपूरच्या जवळ असलेल्या जामवारामगडमधून दोन भावांना अटक करण्यात आली. त्यांनी हा पेपर हरियाणातील एका आयुर्वेद विद्यार्थ्याकडून घेतल्याचे सांगितले. या हरियाणाच्या विद्यार्थ्याने हा पेपर बिहार, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील विद्यार्थ्यांना विकला होता.
एसओजीने जेव्हा या साखळीचा पाठलाग केला, तेव्हा हा तपास थेट महाराष्ट्रात येऊन थांबला. हरियाणाच्या विद्यार्थ्याला हा पेपर नाशिकमधील शुभम खैरनार याने पुरवल्याचे समोर आले आहे. शुभमकडे या पेपरची प्रत्यक्ष प्रत देखील सापडली आहे.
देशभरातील परीक्षा रद्द आणि फेरपरीक्षा
या एका हॉस्टेल मालकाच्या जागरूकतेमुळे सुरू झालेला हा तपास आता सीबीआयच्या हाती सोपवण्यात आला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती पाहता, एनटीएने मंगळवारी नीट युजी 2026 ही परीक्षा अधिकृतपणे रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला. आता ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार असून, त्यासाठीच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. विशेष म्हणजे, यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करण्याची किंवा कोणतेही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज भासणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world