लोकसभेनंतर विधानसभेत एकत्रितपणे निवडणूक लढवणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूका लागतील, मात्र त्यापूर्वी मविआची कोणतीच तयारी नसल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर मविआची एकही संयुकरित्या बैठक झालेली नाही. अपयशामागील कारणांचा शोध घेण्यासंदर्भातही तिन्ही पक्षांमध्ये एकही संयुक्त बैठक झाली नाही. तिन्ही पक्षांतील नेते एकमेकांना वैयक्तिकरित्या भेटले असले तरी त्यांनी संयुक्त बैठक मात्र होऊ शकलेली नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शरद पवार गटातील एक बड्या नेत्याने याबाबत खंत व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे आगामी निवडणुकांमध्ये कोणासोबत लढण्यास फारसे उत्सुक नसल्याचं मत या बड्या नेत्याने व्यक्त केलं आहे. त्यामुळे विधानसभेत जबर फटका बसल्यानंतर आगामी निवडणुकांसाठी तिन्ही पक्ष काय आखणी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नक्की वाचा - Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणीत भर, महाजन कुटुंबीयातील व्यक्तीकडूनच जमीन हडपण्याचा आरोप
दरम्यान ८ जानेवारी रोजी शरद पवार गटाची आढावा बैठक पार पडली. आतापर्यंत विधानसभेतील अपयशामागे ईव्हीएमवर संशय घेणाऱ्या शरद पवारांनी संघाचं कौतुक केलं. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळणाऱ्या घवघवीत यशामागे संघाचा मोठा वाटा असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले.
पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आपण गाफील राहिलो, विधानसभा निवडणूक ही हाताचा मळ असल्याचा समज आम्ही केला. दुसरीकडे विरोधकांनी लोकसभेतील पराभवाकडे गांभीर्याने पाहिलं. आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली. ते घरोघरी गेले आणि प्रचार केला. मतदारांशी संवाद साधला. याचा परिणाम निकालावर दिसून आल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले.