MHADA Home Resale : स्वत:चं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र मुंबईतील घराच्या अव्वाच्या सव्वा किमती पाहिल्या तर हे स्वप्न धूसर वाटायला लागतं. मात्र म्हाडामुळे हे स्वप्न शक्य होतं. काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेता गौरव मोरे याने पवई भागात दीड कोटींचं म्हाडाचं घर (MHADA Home) विकत घेतलं. म्हाडाने अनेकांची स्वप्नं पूर्ण केली आहेत. गरजुंना ही घरं घेता यावीत आणि यात राहाता यावं यासाठी म्हाडाने काही अटी-शर्थीही ठेवल्या आहेत. यातील एका अटीमध्ये मोठा बदल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गरजुंना म्हाडाची घरं उपलब्ध व्हावीत यासाठी सोडतीदरम्यान अनेक अटींचा समावेश करण्यात आला आहे. त्यातील एक अट म्हणजे म्हाडाच्या घराचा ताबा मिळाल्यापासून पुढील पाच वर्षे घर गाळेधारकाला विकता येत नाही. मात्र ही अट शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. लवकरच घराचा ताबा मिळाल्यानंतर केव्हाही विकण्याची मुभा घरमालकांना मिळण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा - Gaurav More Home: गौरव मोरेचं 1.78 कोटींचं अलिशान घर कसं आहे? पाहा VIDEO
म्हाडाकडून याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. या बाबतचा प्रस्ताव म्हाडा प्राधिकरणाऱ्या बैठकीत मांडला जाणार आहे. म्हाडाच्या घराच्या अर्जदारांची सर्व माहिती म्हाडाकडे असते. एकदा लाभार्थी ठरलेल्या अर्जदाराला पुढे म्हाडाच्या सोडतीचा किंवा सरकारी योजनेचा लाभ घेता येणार नाही. यामुळे पाच वर्षांपर्यंत घर न विकण्याची अट काढून टाकण्याबाबत चर्चा झाली. गृहनिर्माण विभागाकडून यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे आदेश म्हाडाला देण्यात आले आहेत, अशी माहिती समोर येत आहे. लोकसत्ताने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
ही अट शिथिल केली तर नागरिक म्हाडाकडून स्वस्त दरात घरं घेऊन ती अतिरिक्त दरात विकली जाण्याची भीती आहे. त्यामुळे म्हाडाच्या मूळ हेतूला हरताळ फासला जाऊ शकतो अशी भीती काही जणांकडून व्यक्त केली जात आहे. याशिवाय अनेक ठिकाणी एजंट म्हाडाकडून स्वस्त दरात घरं घेऊन चढ्या दरात विकत असल्याचीही चर्चा आहे. अशा एजंटगिरीवर नियंत्रण आणण्यासाठी आणखी काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात याचीही चाचपणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.