'संसदेत विरोधी नाही, प्रतिपक्ष म्हणा'; सरसंघचालक मोहन भागवतांचं आवाहन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सोमवारी नागपुरात संघाचा कार्यकर्ता विकास वर्गाचा समापन कार्यक्रम संबोधित केला.

जाहिरात
Read Time: 2 mins

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सोमवारी नागपुरात संघाचा कार्यकर्ता विकास वर्गाचा समापन कार्यक्रम संबोधित केला. यादरम्यान भागवतांनी नुकतीच झालेली झालेली लोकसभा निवडणूक, राजकीय पक्षांच्या वागणुकीवर आपली भूमिका मांडली. सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, या देशातील नागरिकांमध्ये बंधुत्व आहे, हीच बाब आपले विचार आणि कामात आणण्याची गरज आहे. भागवतांनी संसदेत सरकारच्या विरोधी पक्षांना 'प्रतिपक्ष' म्हणण्याचं आवाहन केलं आहे.  

भागवत पुढे म्हणाले की, जर कोणी तुमच्याशी सहमत नसेल तर त्याला विरोधी म्हणणं बंद करा, विरोधी म्हणण्याऐवजी प्रतिपक्ष म्हणा. संसदेत एक पक्ष असतो आणि त्या पक्षासमोर आपलं म्हणणं मांडणारा प्रतिपक्ष असतो. यानिमित्ताने संसदेत कोणत्याही प्रश्नावरून दोन्ही पैलू समोर यावेत, हा उद्देश असतो. यासाठी अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे संसदेत दोन पैलू समोर येतात, मात्र अशावेळी त्यांना विरोधी म्हणण्याऐवजी प्रतिपक्ष शब्द उचित वाटत असल्याचं भागवत म्हणाले.  

नक्की वाचा - Nagpur Hit And Run Case: सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित केला सवाल, म्हणाले....

लोकसभा निवडणुकीतील जनतेचा कौल समोर आला असून प्रत्येक गोष्ट जनतेसाठीच असायला हवी. कशी होईल, कधी होईल? संघ यात पडत नाही. कारण समाजाच्या परिवर्तनातूनच व्यवस्थेत परिवर्तन होतं. भागवतांनी यादरम्यान डॉ. भीमराव आंबेडकरांची आठवण काढली. कोणत्याही मोठ्या बदलासाठी आध्यात्मिक चेतना महत्त्वाची असल्याचं भागवतांनी सांगितलं. भागवत पुढे म्हणाले, सर्वजणं काम करतात. मात्र काम करीत असताना मर्यादेचं पालन करायला हवं. मर्यादा आपला धर्म आणि संस्कृती आहे. या मर्यादेचं पालन करीत जो पुढे जात राहतो, तो कर्म करतो. 

मोहन भागवतांनी यादरम्यान समाजासमोर पाच गोष्टींचा आग्रह केला...

  1. - सामाजिक समरसतेचा व्यवहार
  2. - सर्वांना अधिकार देण्याचा व्यवहार
  3. - पर्यावरणेप्रती समरसतेचा व्यवहार
  4. - स्वआधारित जीवनाची संकल्पना
  5. - संयमित जीवन