समाधान कांबळे
मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेला वाद आता अधिक टोकदार झाला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी NDTV मराठीशी बोलताना मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. इतकेच नव्हे तर, ज्या मराठा आमदारांनी जरांगे यांना पाठिंबा दिला आहे, त्यांना आगामी निवडणुकांमध्ये त्यांची जागा दाखवून देणार असल्याचा थेट इशाराही हाके यांनी दिला. या वक्तव्यांमुळे मराठा विरूद्ध ओबीसी संघर्श अजून पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जरांगेंवर कारवाईची मागणी
नवनाथ वाघमारे यांनी जरांगे पाटलांवर टीका करताना म्हटले की, "त्यांना अक्कल नाही, ते चौथी पास आहे." सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणाऱ्या जरांगेवर राज्य सरकारने कारवाई केली पाहिजे, असेही ते म्हणाले. राज्य सरकार झुंडशाहीच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही वाघमारे यांनी केला. जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या आणि त्यांच्या कार्यपद्धती पाहाता ओबीसी समाजात जरांगेंविरोधात मोठा रोष असल्याचे दिसून येत आहे.
एल्गार मोर्चाचा इशारा
यावेळी बोलताना लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाज आणि त्यांच्या मागण्यांबद्दल अधिक स्पष्टतेने भूमिका मांडली. “तुम्ही तिकडे प्रमाणपत्र वाटा, आम्ही इकडे एल्गार मोर्चा काढतो,” असे म्हणत त्यांनी आरक्षणाच्या लढाईसाठी एल्गार मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. हाके यांनी मराठा आमदारांना थेट आव्हान दिले आहे. "ज्या मराठा आमदारांनी मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांना पाठिंबा दिला, त्या सर्वांना ओबीसी समाज येणाऱ्या निवडणुकांमध्ये घरचा रस्ता दाखवणार." असे हाके यांनी म्हटले. यापुढे ओबीसी समाज मराठा समाजाला मतदान करणार नाही, अशी खूणगाठ बांधल्याचेही हाके यांनी म्हटले.
जरांगे समर्थक मराठा आमदारांना इशारा
हाके यांनी हिंगोलीमध्ये बोलताना म्हटले की, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाचे मत केवळ ओबीसी समाजातील आरक्षणवादी उमेदवारांनाच मिळेल. ओबीसी समाज यापुढे मराठा समाजातील उमेदवाराला मतदान करणार नाही असे हाके यांनी जाहीर केले असून यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मराठा समाजातील उमेदवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.