Ola Uber Strike: ओला उबरची टॅक्सी आज बुक करता येणार नाही ? रॅपिडोचाही मोठा निर्णय

Ola, Uber, Rapido Drivers to Strike: मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये या संपाचा परिणाम जाणवू शकतो

जाहिरात
Read Time: 3 mins
Ola, Uber, Rapido Drivers to Strike: या संपामुळे अनेकांना टॅक्सी, रिक्षा बुक करणे अवघड जाऊ शकते (फोटो- संग्रहीत)
मुंबई:

आज स्वातंत्र्यदिन असून (Independece Day 2025) सर्वत्र सुट्टी आहे. शनिवार आणि रविवारला जोडून ही सुट्टी मिळाल्याने अनेकांनी कुटुंबासह बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन केले आहेत. अशावेळी स्टेशन गाठण्यासाठी, एअरपोर्टला जाण्यासाठी किंवा आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांकडे जाण्यासाठी ओला (Ola), उबर (Uber), रॅपिडो (Rapido) यासारख्या ॲप-आधारित टॅक्सी आणि रिक्षा सेवेचा वापर केला जातो. मात्र आज घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी आवर्जून वाचा आणि आपल्या ओळखीच्या सगळ्या मंडळींनाही शेअर करा, कारण आज ओला, उबर ,रॅपिडोच्या टॅक्सी आणि रिक्षा बुक करता न येण्याची दाट शक्यता आहे. कारण ओला (Ola), उबर (Uber), रॅपिडो (Rapido) सारख्या ॲप-आधारित टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी एक दिवस संपावर जाण्याची घोषणा केली आहे. 

( नक्की वाचा: देशातील 7 ऐतिहासिक शहरांना भेट द्या अन् साजरा करा स्वातंत्र्यदिन )

ओला, उबर, रॅपिडोचा संप कशासाठी ?

ओला, उबर, रॅपिडो चालकांनी एकत्र येत आज 'ना वाहन दिवस' (No Vehicle Day) पाळण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र कामगार सभेने या संपाचे आवाहन केले आहे. ॲप कंपन्या मनमानीपणे वागत असून त्यांच्या कारभाराला कंटाळून हे आंदोलन करण्यात येत असल्याचे चालकांनी म्हणणे आहे. 

ओला, उबर, रॅपिडो चालक कशामुळे संतापले ?

ॲप बेस्ड टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्या मनमानीपणे वागत असून त्या आले आर्थिक शोषण करत असल्याचा आरोप चालकांनी केला आहे. यामुळे चालकांमध्ये नाराजी असून त्यामुळेच हा संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. लोकसत्ता या वर्तमानपत्राने या संदर्भातील बातमी दिली आहे. यानुसार चालकांचे म्हणणे आहे की, त्यांना प्रति किलोमीटर केवळ 8 ते 12 रुपये भाडे दिले जाते, हा दर आरटीओने निश्चित केलेल्या दरापेक्षा बराच कमी असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. इतका कमी दर मिळत असल्याने त्यात इंधन खर्च, वाहनाची देखभाल आणि कर्जाचे हप्ते फेडणे शक्य होत नसल्याचे चालकांचे म्हणणे आहे.  

( नक्की वाचा: लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, शोएब अख्तरनं काढली हेड कोचची लायकी! )

कुठल्या शहरांमध्ये ओला, उबर, रॅपिडोच्या संपाचा परिणाम जाणवणार? 

15 ऑगस्ट रोजी मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक यांसारख्या प्रमुख शहरांमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर (RTO) शांततापूर्ण निदर्शने केली जाणार असल्याची माहिती चालकांनी दिली आहे.  सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हे आंदोलन करण्यात येणार असून या काळात एकही चालक आपले वाहन रस्त्यावर उतरवणार नाही असे जाहीर करण्यात आले आहे.  चालकांनी 15 ऑगस्टचा दिवस  'भारतीय चालक एकता दिन' साजरा करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी RTO कार्यालयासमोर राष्ट्रध्वज फडकावण्याचा निर्णय घेतला आहे. या संपामुळे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना मोठी अडचण निर्माण होऊ शकते, कारण चालकांनी जाहीर केल्यानुसार संप खरोखर पुकारला गेला तर त्यांना लोकल ट्रेन, बेस्ट, एसटी सेवा अशा सार्वजनिक वाहतूक सेवांवर अवलंबून राहावे लागेल.  

Advertisement