Omkar Elephant: 'ओंकार'हत्तीचा हैदोस! आता हत्तीला पकडण्यासाठी कुमकी हत्ती मैदानात, पण...

ओंकार हत्तीला पकडण्यात गावकऱ्यांचीही अडचण होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
सिंधुदुर्ग:

गुरुप्रसाद दळवी

हत्ती इलो रे..अशी हाक सिंधुदुर्गातल्या सातोसे, मडूरा आणि कास या गावांमध्ये सतत ऐकू येते आहे. ओंकार या दहा वर्षाच्या हत्तीने या गावांमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. भातशेती, केळी, नारळी-पोफळीच्या बागांमध्ये ओंकार हत्ती धुडगूस घालत आहे. काही भागात गावकऱ्यांवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. असा हा मस्तवाल हत्ती सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी झाली आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या हत्तीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.  
 
गोवा,कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांमध्ये या ओंकार हत्तीचा वावर असतो. काही दिवसांपूर्वीच तो गोव्यात होता. ओंकार हत्तीने या भागात एका वृद्ध व्यक्तीला चिरल्याचीही घटना घडली आहे. या घटनेनंतर हत्तीला पकडण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांचे वन विभाग या मोहीमेत सहभागी झाले आहेत. तब्बल 60 वनविभागाचे कर्मचारी ओंकार हत्तीच्या मागावर आहेत. ओंकार हत्तीला पकडण्यासाठी पाच ते सहा कुमकी हत्ती देखील मागवले आहेत. 

नक्की वाचा - Bollywood News: पैसे घेतले पण कार्यक्रमाला पोहचलाच नाही! दारुच्या नशेत हॉटेलमध्ये सापडला बॉलिवूडचा मराठी स्टार

कुमकी हत्ती अशा मस्तवाल हत्तींना पकडण्यासाठी प्रशिक्षित असतात. कुमकी हत्ती आकाराने देखील मोठे असतात. त्यांच्या मदतीने गावकरी आणि हत्तींमधला संघर्ष रोखला जातो. असा हा वनविभागाचा ताफा ओंकार हत्तीच्या मागावर आहे. पण ओंकार हत्तीला पकडणं तितकं सोप नसेल. कारण नेहमी वापरली जाणारी यंत्रसामग्री या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये फोल ठरली आहे. हत्तीला घाबरवण्यासाठी जे दारुगोळे वापरले जातात, त्याच दारुगोळ्यांसोबत ओंकार हत्ती खेळताना दिसतो.

नक्की वाचा - Kalyan News: बस, बायको अन् दिड लाखाचा मोबाईल! अर्धा तास बसला रोखलं, ट्राफीक जॅम केलं, प्रकार काय?

ओंकार हत्तीला पकडण्यात गावकऱ्यांचीही अडचण होत आहे. हत्तीला पाहण्यासाठी गावकरी तोबा गर्दी करतात. गोंगाट करतात. त्यामुळे हत्ती सावध होतो. त्याचा माग काढताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. पुढील दोन दिवसात ओंकार हत्तीला पकडलं जाईल असा विश्वास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्याला वनतारा सेंक्च्यूरीमध्ये पाठवलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. वन्य प्राणी आणि माणसांमधला हा संघर्ष हा काही नवा नाही. ओंकार हत्तीच्या रेस्क्यू ऑपरेशनमधून तात्पुरता प्रश्न मार्गी लागेल. मात्र भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे.. 

Advertisement

Topics mentioned in this article