
अमजद खान
बस बायको आणि दिड लाखाचा मोबाईलच्या नादात कल्याणच्या नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागण्याची घटना समोर आली आहे. ही विचित्र घटना कल्याण बस स्थानकात घडली. कल्याणमध्ये वाहतूक कोंडी ही काही नवीन नाही. त्यामुळे कल्याणकर आधीच हैराण झाले आहेत. त्यातच एक अजब प्रकार समोर आला आहे. या झालेल्या प्रकारामुळे पोलीसांनाही तातडीने धावत बसकडे जावं लागलं. तेव्हा कुठे बसमधल्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण तोपर्यंत वाहतूक कोंडीचे तिन तेरा वाजले होते.
कल्याण पश्चिम येथील बैल बाजार परिसरात एक जोडपं राहतं. दिवाळी असल्याने बायकोला माहेरी सोडण्यासाठी एक तरुण बसमध्ये चढला. त्याच वेळी त्याच्या खिशातून त्याचा मोबाईल गायब झाला. मोबाईल असा तसा नव्हता. तर तब्बल दिड लाख रूपये किंमतीचा होता. तो खिशात नाही हे समजल्यावर तरुणाचा स्वत: वरचा ताबा सुटला. त्याने मागचा पुढचा विचार न करता बस ज्या ठिकाणी होती त्याच ठिकाणी रस्त्यात थांबवली.

AI image
नंतर पठ्ठ्याची सुरु झाली ती शोध मोहिम. मोबाईल गायब झाल्यानंतर पठ्ठ्याने बस अर्ध्या रस्त्यात थांबविली होती. त्यानंतर तो प्रत्येक प्रवाशाची बॅग आणि खिसे तपासायला लागला. बस प्रवाशांनी भरली होती. एक एक प्रवाशाची बॅग आणि खिशे तपासून त्यांना खाली उतरवलं जात होतं. लोक ही संतापले होते. पण करणार काय? या सगळ्या गोंधळात ट्राफीकचे तिन तेरा वाजले होते. ट्राफीक जाम झालं होतं. सगळीकडे हॉर्नचा आवाज येत होता. काय घडलं आहे हे कुणालाच समजायला मार्ग नव्हता.
शेवटी वाहतूक कोंडी झाल्याने बाजारपेठ पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. संतोष साळवे याला विचारले तू मोबाईल शोधतोय का. मोबाईल मिळाला का ? लोकांना हैराण का करतोय. तुझी काय तक्रार असेल तर पोलिस ठाण्यात कर. आम्ही मोबाईलचा शोध घेऊ. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र संतोष साळवे याच्या कृत्यामुळे प्रवासी, बस चालक, वाहक आणि वाहतूक पोलिसांचा खोळंबा झाला. त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world