साजन धाबे, प्रतिनिधी
भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारतानं 'ऑपरेशन सिंदूर' राबवलं. भारताच्या एअर स्ट्राईकनं बिधरलेल्या पाकिस्ताननं भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचे सर्व हल्ले भारतानं निष्फळ ठरवले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या काही दिवसांमधील घडलेल्या वेगवान घडामोडीमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे सुट्टीवर असलेल्या जवानांना तातडीनं ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वाशिम जिल्ह्यातल्या जऊळका रेल्वे या गावातील जवान कृष्णा राजू अंभोरे यांनी त्यांच्या देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचं उदाहरण सर्वांसमोर ठेवलंय. लग्नानंतर फक्त चार दिवसांनंतर ते सैन्याकडून आदेश मिळाल्यानंतर तात्काळ कर्तव्य बजावण्यासाठी रवाना झाले आहेत.
( नक्की वाचा : जळगावच्या जवानाला कडक सॅल्यूट! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आला फोन, तातडीनं झाला देशसेवेसाठी रवाना )
नवविवाहित पत्नीला सोडून जातांना कृष्णा अंभोरे यांचं मनं गहिवरलं होतं पण कृष्णाच्या डोळ्यांत केवळ राष्ट्रसेवेचं समर्पण होतं. त्यांना निरोप देण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. गावकऱ्यांनी यावेळी "जय जवान", "वंदे मातरम्" या घोषणा देत अंभोरे यांना शुभेच्छा दिल्या. कृष्णाचं हे पाऊल संपूर्ण वाशिम जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरलं आहे. "देश आधी, बाकी नंतर" हे त्याने आपल्या कृतिशील निर्णयातून सिद्ध केलं आहे.
जळगाव जिल्ह्यातील नवविवाहित जवान रवाना
यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील पाचरोमधील नवविवाहित जवान मनोज ज्ञानेश्वर पाटील देखील तातडीनं कर्तव्य बजावण्यासाठी सीमेवर रवाना झाले आहेत. मनोजचे पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील यामिनी रामचंद्र पाटील हिच्याशी लग्न झाले. या लग्नासाठी 30 दिवसांची सुट्टी घेऊन मनोज पाटील गावी आले होते. 5 मे रोजी लग्नाचा संपूर्ण सोहळा अतिशय थाटामाटात पार पडला. विवाहाच्या दुसऱ्या दिवशी नवविवाहित पत्नी आणि आई-वडिलांसह मनोजनं देवदर्शन केले. 8 तारखेला विवाह निमित्त सत्यनारायणाच्या पूजेचे नियोजन करण्यात आले होते मात्र त्यापेक्षाही कर्तव्याला प्राधान्य देण्याचा निर्णय हा मनोजने घेतला.