Palghar Accident: एक राँग टर्न, 13 जणांचा The END, पालघर अपघाताचे धक्कादायक कारण; चालकाच्या त्या मस्तीनेच...

थोडा वळसा टाळण्यासाठी विरुद्ध दिशेने प्रवास केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, त्याच वेळी गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव कंटेनरचे नियंत्रण सुटल्याने तो बाईकस्वाराला चिरडत थेट टेम्पोवर पलटी झाला. 

जाहिरात
Read Time: 3 mins

मनोज सातवी, पालघर:

Palghar Accident News:  पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात धानीवारीजवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या टेम्पोला भरधाव कंटेनरची जोरदार धडक बसून १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर २५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. चुकीच्या दिशेने वाहन चालवण्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, पालकमंत्री गणेश नाईक यांनी लोकांच्या बेफिकीर मानसिकतेवर नाराजी व्यक्त केली आहे. 

NEET Paper Leak: 'सर्व 180 प्रश्न आमच्याच स्टडी मटीरिअलमधून', स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक सत्य उघड

निष्पाप तेरा जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण..?

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानीवारीजवळ रविवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण पालघर जिल्हा हादरला असून या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. साखरपुड्याच्या आनंदासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या आयशर टेम्पोने थोडा वळसा टाळण्यासाठी विरुद्ध दिशेने प्रवास केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, त्याच वेळी गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव कंटेनरचे नियंत्रण सुटल्याने तो बाईकस्वाराला चिरडत थेट टेम्पोवर पलटी झाला. 

Advertisement

या भीषण धडकेत टेम्पोतील प्रवासी कंटेनरखाली दबले गेले आणि क्षणात आनंदाचे वातावरण आक्रोशात बदलले. घटनास्थळी मृतदेहांचा सडा, जखमींच्या वेदनादायी किंकाळ्या आणि नातेवाईकांचा हंबरडा पाहून उपस्थितांचे काळीज हेलावून गेले. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालय आणि वेदांता रुग्णालयात उपचार सुरू असून प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य राबवले. पालकमंत्री गणेश नाईक यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेताना “लोकांना थोडं अंतर जास्त कापण्याचा धीर राहत नाही आणि चुकीच्या दिशेने वाहन चालवण्याचे हे परिणाम आहेत,” अशा शब्दांत चालकाच्या निष्काळजीपणासोबतच समाजातील बेफिकीर मानसिकतेवर बोट ठेवत तीव्र नाराजी व्यक्त केली. 

पालकमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करत जखमींवर सर्वोत्तम उपचार केले जातील, अशी ग्वाही दिली. दरम्यान, पालघरचे खासदार Hemant Savara आणि पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन देतानाच पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी अपघातामागे टेम्पो चालकाची चूक प्रथमदर्शनी दिसत असली तरी नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होईल, असे सांगितले.

Pune News: कोरेगाव पार्कमध्ये पार्टी केली, घरी परताना धावत्या कारमध्येच वकील तरुणी सोबत 3 जणांनी...

चालकाच्या निष्काळजीपणाने होत्याचं नव्हतं झालं

खासदार सावरा यांनी महामार्गावरील अपूर्ण काँक्रीटीकरण कामांमुळे वारंवार अपघात होत असल्याची खंत व्यक्त करत हा प्रश्न शासनस्तरावर मांडण्याची भूमिका घेतली. तर आमदार राजेंद्र गावित यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींना तातडीची मदत मिळावी तसेच अनेक वर्षांपासून रखडलेले ट्रॉमा सेंटर त्वरित सुरू करण्याची मागणी केली.

एकंदरीत, धानीवारीजवळील झालेला  या दुर्घटनेने वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले असून एका क्षणाच्या निष्काळजीपणाने १३ निष्पाप जीव गमवावे लागल्याची हळहळ संपूर्ण जिल्ह्यात व्यक्त होत आहे.  ज्या गावात साखरपुडा होणार होता त्या ठिकाणी सक्ताचा सडा, निपाचित पडलेले मृतदेह, जखमींच्या किंकाळ्या आणि नातेवाईकांचा आक्रोश यामुळे साखरपुड्याच्या आनंदाच्या समारभा ऐवजी धानीवारीमध्ये मृत्युचा तांडव पाहायला मिळाला. त्यामुळे वाहन चालक, सामान्य नागरिक आणि प्रशासनाने देखील या दुर्दैवी घटनेमधून धडा घेणे गरजेचे आहे..
 

Advertisement