शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या 39 आमदारांपैकी एक असलेले पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांचा तब्बल 36 तासांहून अधिक काळानंतर संपर्कात आले आहेत.
एकनाथ शिंदेंनी त्यांचं तिकीट कापल्यानंतर ते नाराज होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. श्रीनिवास वनगा तिकीट कापल्यानंतर नैराश्यात असून आयुष्य संपवण्याची भाषा करीत असल्याचं वनगा यांच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. दरम्यान काल 29 ऑक्टोबर रोजी ते नॉटरिचेबल झाले होते. अखेर आज आमदार श्रीनिवास वनगा यांच्याशी कुटुंबीयांचा संपर्क झाला. सोमवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून वनगा नॉटरीचेबल होते. श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारल्याने नैराश्यात होते. कुणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. मंगळवारी रात्री उशीरा कुटुंबीयांशी संपर्क झाला.
नक्की वाचा - शिंदेंसोबत गुवाहाटीला गेले तरी तिकीट कापलं, आयुष्य संपवण्याची भाषा करणारे वनगा 12 तासांपासून बेपत्ता!
मात्र आज सकाळी आमदार श्रीनिवास वनगा घरी येऊन पुन्हा बाहेर गेल्याची माहिती आहे. पहाटे तीन वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा राहत्या घरी येऊन निघून गेले. आपण ठीक असल्याचं पत्नी आणि आईला सांगून वनगा पुन्हा निघून गेले. "मला आरामाची गरज आहे, मला बरं वाटलं की मी येईन" असं म्हणून वनगा घरच्यांच्या भेटीनंतर पुन्हा निघून गेले. वनगा आपल्या जवळच्या नातलगांकडे सुखरूप असल्याची पत्नी सुमन वनगा यांची माहिती आहे. पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापण्यात आलं आणि त्यांचं तिकीट राजेंद्र गावित यांना देण्यात आलंय. ही यादी बाहेर आल्यानंतर कुणालाही न सांगता घराबाहेर निघून गेले.