Palghar Crime: 'माझ्यासोबत घाणेरडं...' CEOकडून छळ, बड्या अधिकाऱ्याने उचललं टोकाचे पाऊल

तपासादरम्यान पोलिसांना मृताची एक डायरी आणि मोबाईल सापडला, ज्यामध्ये मृत प्रदीप जाधव यांनी लिहिलेली इंग्रजीतील सुसाईड नोट आढळून आली.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, पालघर:

Palghar Crime:  बोईसर येथील नामांकित 'विराज प्रोफाईल कंपनी'चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रदीप सुखदेव जाधव (वय ५७) यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृत प्रदीप जाधव यांच्या पत्नी वंदना प्रदीप जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून बोईसर पोलिसांनी कंपनीचे सीईओ (CEO) जे. पी. गर्ग यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Omraje Nimbalkar: 'ऑपरेशन टायगर'चा आज फैसला! भल्या पहाटे ठाकरेंचे नेते ओमराजेंच्या भेटीला, काय निर्णय होणार?

CEOच्या त्रासाला कंटाळून अधिकाऱ्याची आत्महत्या 

तक्रारीत नमूद केल्यानुसार, प्रदीप जाधव हे गेल्या काही वर्षांपासून विराज प्रोफाईल कंपनीत कार्यरत होते. मागच्या वर्षी त्यांनी प्रमोशनची मागणी केली असता, सीईओ जे. पी. गर्ग यांनी त्यांना जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. या त्रासाला कंटाळून जाधव यांनी कंपनीचा राजीनामा देऊन दुसऱ्या कंपनीत काम सुरू केले होते. मात्र, विराज प्रोफाईल कंपनीचे सीएमडी नीरज कोचूर यांनी मध्यस्थी करत त्यांना पुन्हा कंपनीत बोलावून घेतले आणि जानेवारी २०२६ मध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदावर रुजू केले. दुर्दैवाने, ते पुन्हा रुजू झाल्यापासून सीईओ जे. पी. गर्ग यांनी त्यांना वारंवार मानसिक त्रास देणे आणि अपमानास्पद वागणूक देणे सुरूच ठेवले होते, ज्याची माहिती जाधव यांनी त्यांच्या पत्नीला वेळोवेळी दिली होती.

Advertisement

चिठ्ठीतून खळबळजनक कारण समोर 

१९ जून २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास जाधव यांच्या घरातील आचाऱ्याने (कुक) त्यांच्या मुलाला फोन करून घरात घडलेल्या विदारक घटनेची माहिती दिली. जाधव यांनी घरात गळफास घेतला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान पोलिसांना मृताची एक डायरी आणि मोबाईल सापडला, ज्यामध्ये मृत प्रदीप जाधव यांनी लिहिलेली इंग्रजीतील सुसाईड नोट आढळून आली.

या चिठ्ठीत त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, "सीईओ जे. पी. गर्ग हे माझ्या कामात सतत चुका काढून माझा छळ करत आहेत आणि माझ्यासोबत घाणेरडे राजकारण खेळत आहेत. माझ्या या टोकाच्या पाऊलाला तेच जबाबदार आहेत." या गंभीर प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्याचे सब-इन्स्पेक्टर नितीन रामचंद्र नराले पुढील तपास करत आहेत.

( नक्की वाचा : Sanjay Raut: संजय राऊतांच्या 'ऑपरेशन तुडवा'ला शिंदेच्या शिलेदाराचे आव्हान; सुरक्षेसाठी शिवसैनिक बनणार ढाल )

Topics mentioned in this article