VIDEO: घराला पुराचा वेढा...समोर मृतदेह, जीव वाचवण्याची धडपड अन् पत्र्यावर मुक्काम; पालघरमधील हृदयद्रावक दृश्य

एका कुटुंबाला तब्बल चार तास मृतदेह घेऊन घराच्या छतावर बसण्याची वेळ आली. 6 जुलै रोजी महापुरा सोबतच येथील लिलाका कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, पालघर:

पालघरच्या केळवे रोड जवळील देवी पाड्यामधील महा पुराचे रौद्ररूप दाखवणारा आणि काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग समोर आला आहे. घरात शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे एका कुटुंबाला तब्बल चार तास मृतदेह घेऊन घराच्या छतावर बसण्याची वेळ आली. 6 जुलै रोजी महापुरा सोबतच येथील लिलाका कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले. 

एकीकडे मृतदेह, दुसरीकडे स्वतःला जीव वाचवण्याची धडपड..

येथील ५५ वर्षीय अनुसया मनोहर लिलका यांचा मृतदेह चक्क घराच्या पत्र्यावर ठेवावा लागला. एका बाजूला प्रिय व्यक्तीचा मृतदेह... तर दुसऱ्या बाजूला स्वतःचा जीव वाचवण्याची धडपड. अशी भयंकर परिस्थितीत या कुटुंबावर ओढवली होती. मात्र या देवी पाड्यातील एकाही पूर बाधित कुटुंबाला अद्याप कोणतीही मदत मिळालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. NDTV मराठीच्या टीमच्या हाती पालघर मधील महापुराच्या भयाण वास्तव दाखवणारा  आणखी एक व्हिडिओ हाती लागला आहे.

Advertisement

अनुसया  लिलका  यांचा अल्पशा आजाराने डहाणूच्या धुंदलवाडी येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून केळवे रोड येथे आणण्यात आला. परंतू  पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या रेल्वे अंडरपासमध्ये पुराचे पाणी साचल्याने छातीभर पाण्यातून मृतदेह घरापर्यंत आणावा लागला.

Traffic Changes: पुणे- पंढरपूर महामार्गावरील वाहतुकीत बदल! कोणते रस्ते बंद? जाणून घ्या पर्यायी मार्ग

महापुराचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

अशातच सकाळी पावसाचा जोर वाढला आणि काही वेळातच पुराचे पाणी घरात शिरले. पाण्याचा प्रवाह इतका वाढला की मृतदेह वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला. अखेर कुटुंबीयांनी घराच्या छताचे दोन सिमेंटचे पत्रे फोडले आणि मोठ्या कष्टाने मृतदेह छतावर नेला. प्लास्टिकने मृतदेह झाकून ठेवत कुटुंबीयांनी तब्बल चार तास छतावरच आसरा घेतला.

त्यावेळी लिलका कुटुंबाने या चार तासांत अक्षरशः काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग अनुभवला. चार तासांनंतर पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले. त्यानंतर मृतदेह पुन्हा खाली आणण्यात आला. ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे केला. लाकडांची व्यवस्था करून देवी पाडा स्मशानभूमीत अनुसया लिलका यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या पुराच्या पाण्याने अनुसया लिलका यांचा शेवटच्या प्रवासाचा मार्ग देखील रोखून धरला होता. त्यामुळे निसर्गाच्या संकटासमोर माणूस किती हतबल होतो, याचं जिवंत उदाहरण केळवे रोडच्या देवी पाड्यात पाहायला मिळालं.

Mumbai News: मॅनहोलच्या सर्व समस्यांबाबत BMC अ‍ॅक्शन मोडवर, 'या' WhatsApp नंबरवर पाठवा सर्व तक्रारी