महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या सुधारित आदेशामुळे पालघर नगरपरिषद आणि वाडा नगरपंचायत निवडणुकीतील प्रत्येकी एका प्रभागाची निवडणूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. न्यायालयीन अपील दाखल असलेल्या प्रकरणांमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, केवळ हे दोन प्रभाग वगळता इतर सर्व ठिकाणी 2 डिसेंबर 2025 रोजी निर्धारित कार्यक्रमानुसारच मतदान होणार आहे.
नक्की वाचा: आमदाराच्या मर्सिडिजने उडवलं, चिमुकली चेंडुसारखी हवेत... धक्कादायक CCTV फुटेज
बंड्या म्हात्रेंविरोधात दाखल अपीलावरील वेळेत निर्णय नाही
पालघर नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक 1-ब (सर्वसाधारण) मधील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. येथील उमेदवार रवींद्र उर्फ बंड्या म्हात्रे (शिवसेना-शिंदे गट) यांच्या घरपट्टी थकबाकीसंदर्भात दाखल झालेले अपील जिल्हा न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने निवडणूक आयोगाला हा निर्णय घ्यावा लागला. ठाकरे गटाचे उमेदवार आरिफ कलाडिया यांनी म्हात्रेंविरोधात घरपट्टी थकबाकीबद्दलचा आक्षेप नोंदवला होता. 2 डिसेंबरला नगराध्यक्ष पदाची निवडणूक तसेच प्र. क्र. 1-ब वगळता इतर सर्व प्रभागांतील सदस्य पदासाठीची निवडणूक पूर्वनियोजित वेळेतच होणार असल्याची प्रशासनाने माहिती दिली आहे. म्हात्रे यांनी यापूर्वी तीन वेळा नगरसेवक म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
नक्की वाचा: बिबट्या उधळतोय प्रचार सभा! जाहीरनाम्यातही त्याची दहशत, पुण्यात काय घडतंय?
वाड्यातील प्रभाग क्र.12 मधील निवडणूक तात्पुरती स्थगित
दुसरीकडे, वाडा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 12 ची निवडणूकही तात्पुरती स्थगित झाली आहे. प्रभाग 12 मधून अर्ज दाखल केलेले प्रसाद ठाकरे यांचे नामनिर्देशन पत्र 18 नोव्हेंबर 2025 रोजी छाननीत बाद करण्यात आले होते. प्रसाद ठाकरे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. ठाकरेंशी संबंधित अपीलावर राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कालमर्यादेच्या म्हणजे 22 नोव्हेंबरपर्यंत निर्णय लागू शकला नव्हता. यामुळे या प्रभागासाठीची निवडणूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. या प्रभागासाठीची निवडणूक कधी होणार हे जिल्हाधिकारी ठरवतील असे निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब अंधारे यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. वाड्यात नगराध्यक्ष पदासह उर्वरित सर्व प्रभागांतील सदस्य पदांसाठी मतदान 2 डिसेंबर रोजीच होणार आहे. प्रभाग क्रमांक 12 मधून भरती सपाटे (UBT + काँग्रेस), प्रफुल पाटील (NCP-अजित पवार गट) आणि प्रमोद पठारे (BJP) हे प्रमुख उमेदवार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर वाडा आणि पालघरमधील दोन प्रभागांमधील निवडणुकीला मिळालेली स्थगिती ही तिथल्या उमेदवारांचा हिरमोड करणारी ठरली आहे.
निवडणूक आयोगाचा आदेश नेमका काय आहे ?
4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली होती. एकूण 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड करण्यासाठी 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणूक जाहीर केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने एक आदेश जारी केला होता. ज्या नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये ज्या प्रभागासंदर्भात अपील दाखल होते परंतु अपीलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून 22 नोव्हेंबर 2025 नंतर देण्यात आलेला आहे अशा नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील त्या विशिष्ट सदस्यपदासाठीची निवडणूक 4 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार घेऊ नये असे आदेशात म्हटले होते.