श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या (Vitthal Rukmini Temple) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने 15 जूनपासून टोकन दर्शन प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तरी 24 जून रोजी टोकन दर्शनाचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेत प्रवेश करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील 6 व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात देऊन कडक कारवाई येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. (Fake token darshan pass)
मंदिर समिती मार्फत दर्शन रांगेतील भाविकांचे सुलभ आणि जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्या टोकन दर्शन प्रणालीचे पासेस मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर बुकिंगची सोय आहे. त्यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय त्याच्या चांगल्या प्रतिक्रिया देखील उमटत आहेत.
नक्की वाचा - Pandharpur News: पंढरपूर टोकन दर्शन सुविधा 27 जूनपासून बंद होणार; मंदिर प्रशासनाचा निर्णय
24 जून रोजी सकाळी 9 वाजता हिंगोली जिल्ह्यातील पार्वतीबाई बापूराव बेले, लक्ष्मीबाई केशवराव बळे, संध्या मारूतीराव सातपुते, अरूणा विठ्ठलराव सातपुते, सुधाकर रामचंद्र भालेराव आणि केशव गणपतराव हरबळे या व्यक्तीं टोकन दर्शन प्रणालीचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेतील प्रवेशद्वारावर आल्यानंतर नियमानुसार पासची तपासणी केली असता पास बोगस असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांना पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देऊन, त्यांच्यावर कारवाई करण्याची कार्यवाही सुरू आहे.
मंदिर समितीच्या वतीने असे आवाहन करण्यात येते की, टोकन दर्शन प्रणालीचे पासेस मंदिर समितीच्या https://www.vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळावरून बुकींग करावेत. जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. याशिवाय, सदरचा पास संपूर्णत: निशुल्क आहे, असे यावेळी व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.