संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
Pandharpur Vitthal Temple New Darshan Mandap: पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि सोयीचा होणार आहे. पदस्पर्श दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहणाऱ्या भक्तांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून मोठी भेट मिळणार आहे.
तब्बल 129 कोटी रुपये खर्च करून पंढरपुरात एक अत्याधुनिक आणि पंचतारांकित सुविधांनी सज्ज असा दर्शन मंडप उभारला जात आहे. विशेष म्हणजे येत्या आषाढी वारीतच या नव्या व्यवस्थेचा अनुभव भाविकांना घेता येण्याची शक्यता आहे.
'या' त्रासातून भाविकांची कायमची सुटका
आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळात विठुरायाच्या दर्शनाची रांग 7 ते 8 किलोमीटरपर्यंत लांब जाते. आतापर्यंत गोपाळपूर रोडवरील तात्पुरत्या पत्राशेडमध्ये भाविकांना ताटकळत उभे राहावे लागत होते. ऊन, वारा आणि पावसाचा सामना करत भाविक विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत पोहोचत असत.
मात्र, आता ही तात्पुरती सोय इतिहासजमा होणार असून, त्याऐवजी एक कायमस्वरूपी आणि भव्य दर्शन मंडप भाविकांच्या सेवेत दाखल होणार आहे. शासनाकडून या कामासाठी 129 कोटी रुपये मंजूर झाले असून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.
( नक्की वाचा : Anil Agarwal: 35000 कोटींचा मालक करणार 75 टक्के संपत्ती दान! मुलाच्या जाण्यानंतर वेदांताच्या मालकाचा निर्णय )
दोन एकर जागेत अत्याधुनिक सुविधांचे जाळे
गोपाळपूर रोडवरील सुमारे 2 एकर जागेत हा भव्य दर्शन मंडप साकारला जात आहे. महसूल विभागाने नुकतीच ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवली असून, प्रत्यक्ष कामाला महिन्याभरात सुरुवात होणार आहे.
या मंडपाची रचना एखाद्या पंचतारांकित सोयींप्रमाणे असेल. यात वातानुकूलित दर्शन रांगा, स्वच्छ स्वच्छतागृहे, भाविकांसाठी अन्नछत्र, विश्राम कक्ष आणि आपत्कालीन मार्गांची व्यवस्था असेल. तसेच आरोग्यासाठी प्रथमोपचार केंद्र आणि अतिदक्षता विभागही या ठिकाणी कार्यरत राहणार आहे.
( नक्की वाचा : ZP Election : पंढरपुरात नवा ट्विस्ट! जिल्हा परिषदेसाठी संभाजी ब्रिगेड मैदानात; 'या' पक्षांशी हातमिळवणी करणार? )
वृद्ध आणि दिव्यांग भाविकांसाठी विशेष सोय
विठ्ठल भक्तीत तल्लीन असलेल्या वयोवृद्ध आणि दिव्यांग भाविकांचा विचार करून या मंडपात विशेष रेलिंग आणि लिफ्टची सुविधा दिली जाणार आहे. तसेच मंदिरात जाईपर्यंत भाविकांना विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन घेता यावे, यासाठी जागोजागी स्क्रीन लावले जातील.
दर्शन मंडपापासून थेट मंदिरापर्यंत स्काय वॉकची उभारणी केली जाणार आहे, ज्यामुळे भाविकांना रस्त्यावरील गर्दीचा अडथळा न येता थेट मंदिरापर्यंत जाता येईल.
या प्रकल्पाचे काम अतिशय वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. संबंधित कंत्राटदाराने आषाढी यात्रेपूर्वी 80% काम पूर्ण करण्याचे आश्वासन मंदिर समितीला दिले आहे. त्यामुळे 2026 मध्ये हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होणार असला, तरी यंदाच्या जून महिन्यात होणाऱ्या आषाढी वारीतच या मंडपाचा काही भाग भाविकांसाठी वापरता येण्याची दाट शक्यता आहे. या नव्या व्यवस्थेमुळे वारकरी बांधवांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी आता अधिक कष्ट घ्यावे लागणार नाहीत.