जाहिरात

Kolhapur News: गड वाचवा, इतिहास जपा! पन्हाळगडावरील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर, काय आहे प्रकरण?

Panhala Fort Sadoba Lake Controversy : ऐतिहासिक किल्ले पन्हाळगडावरील सादोबा तलाव परिसरात झालेल्या एका तीन मजली बांधकामामुळे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण तापले आहे.

Kolhapur News: गड वाचवा, इतिहास जपा! पन्हाळगडावरील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर, काय आहे प्रकरण?
Panhala Fort : न्हाळा किल्ल्याच्या चार दरवाजा प्रवेशद्वाराजवळ असलेला हा सादोबा तलाव ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
कोल्हापूर:

विशाल पुजारी, प्रतिनिधी

Panhala Fort Sadoba Lake Controversy : ऐतिहासिक किल्ले पन्हाळगडावरील सादोबा तलाव परिसरात झालेल्या एका तीन मजली बांधकामामुळे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण तापले आहे. या बांधकामावरून हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. पन्हाळगड हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि इतिहासाचा अविभाज्य भाग असल्याने या प्रकरणाला आता मोठे वळण लागले आहे.

काय आहे कारण?

कोल्हापुरातील किल्ले पन्हाळगडावर सादोबा तलावाच्या शेजारी एक तीन मजली इमारत उभी राहिली आहे. या इमारतीचे बांधकाम पूर्णपणे अनधिकृत असल्याचा दावा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला आहे. पन्हाळा किल्ल्याच्या चार दरवाजा प्रवेशद्वाराजवळ असलेला हा सादोबा तलाव ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच परिसरात हे बांधकाम झाल्याने शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या बांधकामाला परवानगी नेमकी कोणी दिली आणि ऐतिहासिक वारसा स्थळाच्या नियमांचे उल्लंघन कसे झाले, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

( नक्की वाचा : Solapur News : माढ्यात शरद पवारांच्या आमदाराचा फडणवीस पॅटर्न; भाजपाच्या प्रकल्पाचा भरसभेत प्रचार )
 

हिंदुत्ववादी संघटनांचा इशारा

विश्व हिंदू परिषद आणि हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात सादोबा तलाव परिसरातील ते तीन मजली बांधकाम तातडीने हटवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जर प्रशासनाने वेळेत हे अनधिकृत बांधकाम हटवले नाही, तर इतिहासाच्या रक्षणासाठी आणि गडकोट जपण्यासाठी शिवभक्त स्वतः मैदानात उतरतील, असा स्पष्ट इशारा दीपक देसाई आणि कुंदन पाटील यांनी दिला आहे. या आक्रमक भूमिकेमुळे पन्हाळगडावर खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सादोबा तलावाचे ऐतिहासिक महत्त्व आणि पुरावे

सादोबा तलावाचा इतिहास सांगताना गजानन तोडकर यांनी काही महत्त्वाचे दाखले दिले आहेत. औरंगजेबाने जेव्हा पन्हाळगडाला वेढा घातला होता, तेव्हा तयार करण्यात आलेल्या नकाशातही या सादोबा तलावाचा उल्लेख आढळतो. 

( नक्की वाचा : छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून पेटाऱ्यातून निसटलेच नाहीत? विश्वास पाटील यांचा खळबळजनक दावा,सादर केले पुरावे )

तलाव परिसरात असलेल्या शिलालेखांवरूनही या जागेचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट होते. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच पन्हाळगड किल्ल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले आहे. अशा जागतिक दर्जाच्या वारसा स्थळावर नियम डावलून बांधकाम झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

या वादावर स्थानिक नगरसेवक शाबाज मुजावर आणि काही नागरिकांनी आपली बाजू मांडली आहे. वारसा स्थळात नोंद झाल्यानंतरही किल्ल्यावर अनेक जुनी बांधकामे आहेत, असे मत काहींनी व्यक्त केले आहे. दुसरीकडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. 

त्यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली असून, लवकरच सर्व संबंधित घटकांची बैठक घेऊन यावर कायदेशीर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले आहे. आता प्रशासन या तीन मजली इमारतीवर नेमकी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com