Parbhani News: सुप्रीम कोर्टाचे आदेश धाब्यावर! सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातावर गुन्हा

औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशात पोलिसांवर गुन्हा दाखल करा असाच आदेश होता. यामुळे दोषींना थेट संरक्षण मिळत असल्याचा आरोप होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

परभणी: परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला असून, याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 'पोलिसांवर गुन्हा दाखल करा' असा स्पष्ट उल्लेख नसल्याचा गैरफायदा घेऊन, पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  पण औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशात पोलिसांवर गुन्हा दाखल करा असाच आदेश होता. यामुळे दोषींना थेट संरक्षण मिळत असल्याचा आरोप होत आहे.

परभणी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात  सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूसाठी पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.  या प्रकरणी कुटुंबीयांनी न्यायालयाकडे धाव घेतली होती. याबाबात सुप्रीम कोर्टाने 'पोलिसांवर गुन्हा दाखल करावा' असा स्पष्ट उल्लेख केला नाही. याचाच फायदा घेऊन पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

सोमनाथ यांच्या पत्नी विजयाबाई यांनी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, सोमनाथ यांच्या मृत्यूसाठी पोलीसच जबाबदार आहेत. त्यांनी न्यायालयात धाव घेऊन न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी 30 जुलै रोजी या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Advertisement

 सोमनाथ यांच्यावर मारहाण झाल्याचा आरोप आहे. त्यांच्या शरीरावर अनेक खुणा होत्या, असे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणीही होत आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

मात्र त्यांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनीही पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.