Parbhani ZP Election: भाजपच्या सुरेश वरपूडकरांना जबर धक्का! एकाच घरातील 5 पैकी 4 सदस्य पराभूत

Parbhani ZP Election: सुरेश वरपूकर यांचा मुलगा, मुलगी, सून, पुतण्या हे शिंगणापूर, दैठणा, झरी आणि लोहगाव या चारही महत्त्वाच्या जागांवर वरपूडकर गटाला पराभवाचा धक्का बसला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
BJP Suresh Warpudkar

नजीर खान, परभणी

परभणी जिल्ह्याच्या राजकारणात अनेक दशकांपासून दबदबा असलेल्या वरपूडकर कुटुंबासाठी जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल अत्यंत धक्कादायक ठरले आहेत. माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या कुटुंबातील 5 सदस्य रिंगणात होते, परंतु त्यापैकी चौघांना जनतेने नाकारले आहे. सुरेश वरपूकर यांचा मुलगा, मुलगी, सून, पुतण्या हे शिंगणापूर, दैठणा, झरी आणि लोहगाव या चारही महत्त्वाच्या जागांवर वरपूडकर गटाला पराभवाचा धक्का बसला आहे.

कोणाचा कुठे झाला पराभव?

  • समशेर वरपूडकर (मुलगा)- शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून सुरेश वरपूडकर यांचे चिरंजीव समशेर वरपूडकर यांना ठाकरे गटाचे पांडुरंग खिल्लारे यांनी धूळ चारली.
  • प्रेरणा वरपूडकर (सून)- दैठणा गटातून वरपूडकरांच्या सून प्रेरणा वरपूडकर यांचा काँग्रेसच्या ज्योत्सना घाडगे यांनी पराभव केला.
  • सोनल देशमुख (मुलगी) - झरी सर्कल येथून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणाऱ्या वरपूडकर यांच्या कन्या सोनल देशमुख यांचा भाजपचे दिलीप देशमुख यांनी पराभव केला.
  • बोणी वरपूडकर (पुतण्या) - लोहगाव गटात 'काका पुतण्या' नव्हे तर 'पुतण्या विरुद्ध पुतण्या' असा सामना रंगला होता. येथे बोणी वरपूडकर यांचा दुसरा पुतण्या अजित वरपूडकर यांनी पराभव केला.

(नक्की वाचा-  Solapur ZP Result: राम सातपुतेंनी वचपा काढला! मोहिते-पाटील अन् जानकरांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा गुलाल)

एकाच घरातून 5 उमेदवार आणि 3 पक्ष

या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सुरेश वरपूडकर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून उमेदवारी घेतली होती. मुलगा, सून आणि पुतण्या भाजपकडून रिंगणात होते. मुलगी सोनल देशमुख यांनी ठाकरे गटाकडून (शिवसेना UBT) उमेदवारी मिळवली होती. या 'फॅमिली ड्रामा'मुळे निवडणूक आधीच चर्चेत होती, मात्र निकालानंतर मतदारांनी एकाधिकारशाहीला नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

परभणीच्या ग्रामीण भागातील मतदारांनी या निकालाद्वारे घराणेशाहीला कडक इशारा दिला आहे. एकाच घरातील पाच जणांना उमेदवारी देणे जनतेला रुचलेले दिसत नाही. या पराभवामुळे सुरेश वरपूडकर यांच्या स्थानिक राजकारणातील पकडीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
 

Topics mentioned in this article