परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष निवडीवरून ब्राह्मण समाजात नाराजी, अजित पवारांना घरचा आहेर

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:


स्वानंद पाटील, प्रतिनिधी

राज्य सरकारनं नुकत्याच स्थापन केलेल्या ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकसासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती केली आहे. या महामंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस आणि बदलापूरचे माजी नगरसेवक आशिष दामले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या निवडीवर ब्राह्मण समाजातूनच नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अजित पवार पक्षातून या निवडीच्या विरोधात नाराजीचा सूर उमटला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

परळीचे माजी नगराध्यक्ष तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी या निवडीला सोशल मीडियावर पोस्ट करत विरोध केला. बाजीराव धर्माधिकारी हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. बाजीराव धर्माधिकारी यांनी व्हाट्सअपवर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

परळीत ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजन करत बाजीराव धर्माधिकारी यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे यासाठी प्रयत्न केला होता. तसेच शासन दरबारी देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी पाठपुरावा केला.हे महामंडळ स्थापित व्हावे म्हणून उभारलेल्या ब्राम्हण समाजाच्या विविध आंदोलनात आशिष दामले कधीच सक्रिय नव्हते,दामलेंच्या नियुक्तीमुळे विशेष करून मराठवाड्यातील ब्राह्मण समाजाला मोठा धक्का पोहोचला असल्याची चर्चा आहे.

या महामंडळाच्या मागणीसाठी ब्राह्मण समाजानं मराठवाड्यात वेगवेगळी आंदोलनं केली होती. त्यामुळे अध्यक्ष मराठवाड्यात विविध आंदोलन मराठवाड्यात केले गेले. तर काहींनी आमरण उपोषण केले म्हणून अध्यक्ष पण मराठवाड्यातून होईल असे वाटले होते. या आंदोलनात सक्रिय सहभाग असणारा कुणी अध्यक्ष होईल अशी अपेक्षा होती. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची निवड केल्यानंतर त्यांच्याच पक्षातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

( नक्की वाचा :  शरद पवार बीडमध्ये भाकरी बदलणार! जरांगे-पाटलांच्या सहकाऱ्याला देणार उमेदवारी? )

दामलेंची वादग्रस्त कारकिर्द

परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष दामले यांची कारकिर्द देखील वादग्रस्त ठरली आहे. इंदगाव येथील साधना भवन आश्रमातून तरूणीचे अपहरण, दरोडा आणि दंगल केल्याप्रकरणी त्यांच्यावर काही वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

याप्रकरणी दामले यांच्याविरोधात कुळगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये दंगल, दरोडा आणि अपहरण आदी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. असा वादग्रस्त इतिहास असलेल्या व्यक्तीची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.