Pawanraje Nimbalkar Murder Case Verdict: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल लागणार होता. मात्र कोर्टाने पुन्हा एकदा नवी तारखी दिली असून आता 20 जून रोजी या प्रकरणााचा निकाल लागणार आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर व त्यांचे ड्रायव्हर समद काझी यांची 2006 मध्ये मुंबईतील कळंबोलीजवळ गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यासह ९ जणांवर ही हत्या घडवून दिल्याचा आरोप आहे. आज या प्रकरणी निकाल लागणार होता, या सुनावणीआधी ओमराजे निंबाळकर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले ओमराजे निंबाळकर?
"आयुष्यात ज्यासाठी संघर्ष केला, अपेक्षा हीच आहे की न्याय देवतेने न्याय करावा. ओमराजेंना बोलताना भावना अनावर झाल्या. भारतीय न्यायव्यस्थेवर माझा विश्वास आहे. त्या जोरावरच आम्ही मागील २० वर्षांपासून हा लढा देत आहोत.न्याय मिळण्यासाठी आम्ही संघर्ष करतोय सर्वसामान्यांच्या लोकांच्या आशीर्वादाने मी दोन्ही लढाया लढतो. राजे साहेबांच्या हत्येमुळेच मी राजकारणात आलो. आपल्याला राजकीय विरोधक नको म्हणून सुनियोजित कट रजून ही हत्या झाली होती, मला आपल्या न्यायदेवतेवर विश्वास आहे, दोषींना फाशीच व्हावी, हीच माझी मागणी आहे, असं ते म्हणाले.
20 वर्षे 13 दिवस संघर्षाची , अपेक्षा न्यायाची: ओमराजे निंंबाळकरांचे ट्वीट
माझे वडील पवनराजे निंबाळकर साहेब व त्यांचे चालक समद काझी यांची निष्ठूर हत्या होऊन सुमारे 20 वर्षे झाली. अजूनही आम्ही दोन्ही कुटुंबीय न्याय होण्याच्या प्रतीक्षेत आहोत. आज न्यायदेवता न्याय करणार आणि ज्यांनी रक्ताच्या नात्याला काळीमा फासला अश्याचा आज फैसला होणार ही अपेक्षा. हा खटला म्हणजे मस्तवाल राजकीय शक्ती व पैशाच्या मस्तीवर लोकांना गुलाम समजणाऱ्या, त्यांच्या जीवाची किंमत नसणाऱ्या, रक्ताच्या नात्याचा घात करणाऱ्या मानसिकतेविरुद्ध हा संघर्ष आहे
आजपर्यंत अनेक परीक्षा दिल्या पण कोणत्याच निकालासाठी एवढा वेळ लागला नाही. आज येणाऱ्या या निकालाकडे आमचे दोन्ही कुटुंबीय आस लाऊन न्यायाची अपेक्षा करत आहेत. न्यायाला उशीर झाला आता त्यावर बोलण्यापेक्षा आज तरी राजेसाहेबांच्या व समद काझी यांच्या खुन्याला कठोर शिक्षा व्हावी एवढीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे,असंही ओमराजे निंबाळकर म्हणाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world