सुरज कसबे, पिंपरी चिंचवड
Pimpri Chinchwad News: पिंपरी चिंचवडमध्ये आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात दूषित पाण्यामुळे २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रकृती बिघडलेल्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
दूषित पाण्याचा त्रास, विद्यार्थी रुग्णालयात!
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वसतिगृहातील दूषित पाणी प्यायल्याने विद्यार्थ्यांना अचानक उलट्या, जुलाब आणि मळमळ असा त्रास सुरू झाला. प्रकृती खालावल्याने सर्व विद्यार्थ्यांना तातडीने भोसरी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले असले, तरी ८ ते १० विद्यार्थ्यांवर अजूनही उपचार सुरू आहेत.
सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड केला आहे. शासनाकडून कोट्यवधींचा निधी मिळूनही वसतिगृहातील वॉटर फिल्टर अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहे. वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले, त्यामुळे आम्हाला बाहेरचे पाणी प्यावे लागले, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
विद्यार्थ्यांनी यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून प्रशासनाकडे स्वच्छ पाण्याची मागणी केली होती. इतकी गंभीर घटना घडूनही आदिवासी प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आपल्या मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त पालकांनी केली आहे.