सुरज कसबे, पिंपरी चिंचवड
Pimpri Chinchwad AI Security CCTV: पिंपरी-चिंचवड शहर आणि औद्योगिक पट्ट्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्चस्तरीय समितीने (HPC) एकात्मिक सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे गुन्हे नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड शहरात आता अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये हायटेक कवच..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी-चिंचवडच्या सुरक्षेसाठी हाय-टेक कवच कार्यान्वित करण्यात येणार आहे. या एआय आधारित सीसीटीव्ही प्रकल्पास शासनाने मंजुरी दिली आहे. यात स्मार्ट सिटी आणि महापालिकेचे विद्यमान कॅमेरे नवीन यंत्रणेशी जोडले जाणार असून, उर्वरित भागात नवीन कॅमेरे बसवले जाणार आहेत. याद्वारे चाकण, तळेगाव, भोसरी एमआयडीसी आणि हिंजवडी आयटी पार्क यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष निगराणी ठेवली जाणार आहे.
Ganesh Naik: '...तर यांचा नामोनिशान संपवून टाकू', गणेश नाईक यांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा
पालखी सोहळ्यावेळी होणार मदत
ही यंत्रणा देहू-आळंदी या तीर्थक्षेत्रांमधील गर्दीचे नियोजन आणि पालखी सोहळ्यातील सुरक्षेसाठी हे जाळे उपयुक्त ठरेल असा विश्वास देखील पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे. यासाठी नवीन पोलिस आयुक्तालयात कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारले जाणार आहे, ज्याचे थेट प्रक्षेपण सर्व पोलिस ठाण्यांना उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प राबविला जात आहे. पायाभूत सुविधांच्या विस्तारासोबतच या तंत्रज्ञानामुळे गुन्हे शोध आणि आपत्कालीन प्रतिसादाचा वेग वाढणार असून, नागरिकांमधील सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल,असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.