Ganesh Naik Vs DCM Eknath Shinde: राज्यातील महानगरपालिका निवडणुकानंतर महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर येऊ लागली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते, मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वारंवार कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. गणेश नाईक यांच्याकडून एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिले गेल्याने भाजप- सेनेमध्ये वाद वाढताना दिसत आहे. अशातच आता गणेश नाईक यांनी ठाणे, कल्याणमधील निकालावरुन एकनाथ शिंदेंवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे.
काय म्हणाले गणेश नाईक?
महापालिका निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाल्यानंतरही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटामध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. मुंबईमधील 11 प्रभागांमध्ये शिंदे गटाने छुप्या पद्धतीने काँग्रेसला मदत केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. अशातच आता ठाणे, कल्याण डोंबिवलीमधील निकालावरुन वनमंत्री गणेश नाईक यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचले आहे.
" ठाण्याला, कल्याणला, उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पक्षाची परवड झाली. ठाणे, कल्याण, उल्हासनगरधील भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता खुश नाही. भारतीय जनता पक्षाच्या घोड्याचे लगाम खेचले गेले. पण भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे, कोणाच्या मनात असो नसो आदेश मानला गेला.या निवडणुकीत महायुती होऊ नये असेच मी म्हणत होतो. निवडणुकानंतर पुन्हा युती करता आली असती, ज्याचे नगरसेवक त्याचा महापौर केला असता, असे मंत्री गणेश नाईक म्हणाले.
'तर नामोनिशाण संपवू'
तसेच "किल्ले कोणाचेही नाहीत, पक्षाने परवानगी दिली तर यांचे नामोनिशान साफ करून टाकू. भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे आणि आम्ही आदेश मानतो. पक्षाकरता मनाला पटत नसताना कार्यकर्त्यांनी काही गोष्टी सहन केल्या. पक्षाने सूट दिली असती तर कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये एकट्याचा महापौर होऊ शकला असता. नवी मुंबईत तो झाला, मीरा भाईंदरमध्ये तो झाला," असेही गणेश नाईक यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world