विशाल पुजारी, प्रतिनिधी
Kolhapuri Chappal: गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील अस्सल कोल्हापुरी चप्पलच्याबाबतचा वाद चांगलाच पेटला आहे. इटालियन फॅशन ब्रॅण्ड प्राडाने कोल्हापुरी चप्पलची नक्कल करून आपल्या फॅशन शोमध्ये प्रदर्शन केले. यानंतर ती चप्पल कोल्हापुरी चप्पलची नक्कल असून कोल्हापुरला आणि भारताला त्याचा सन्मान देणे गरजेचे आहे असे मत अनेकांनी व्यक्त केलं. विशेषत: सोशल मीडियावर याचे तीव्र पडसाद उमटले होते.
या वादविवादानंतर प्राडाच्या एका टीमने मंगळवारी (15 जुलै) कोल्हापुरातील चप्पल कारागिरांनी भेट घेत घेतली. यावेळी कोल्हापुरी चप्पल कशी तयार होते हे पाहत असताना काही सदस्यांनी कोल्हापुरी चप्पल परिधान करताच या चप्पलचे आणि हस्तकेलेचे कौतुकही केले. कोल्हापुरी पायताण घालून चप्पल आवडल्याची दिली प्रतिक्रिया देखील टीमने दिली
कोल्हापुरात प्राडाची पहिली टीम दाखल
कोल्हापूरमध्ये मंगळवारी दाखल झालेल्या टीममध्ये प्राडा कंपनीच्या संकलन आणि विकास विभागाचे संचालक आंद्रे बॉक्सरो, पुरुष तांत्रिक आणि उत्पादन विभागाचे संचालक पाओलो टिव्हरॉन, फुटवेअर विभागाचे व्यवस्थापक डॅनियल कोंटू, सल्लागार आंद्रिया पोलास्ट्रेली, रॉबट्रो पोलास्ट्रेली, गौतम मेहरा यांचा समावेश होता. ही टीम कंपनीची टेक्निकल टीम होती. ज्यावेळी कारागीरांशी ही टीम भेटली तेव्हा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी हे देखील यावेळी उपस्थित होते.
कोल्हापुरी चप्पल कारागीरांना भेट देण्याचं कारण काय?
कोल्हापुरी चप्पल प्राडा कंपनीने मेन्स फॅशन शोमध्ये दाखवला असा आरोप केला गेलेला. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चाना उधाण आलेलं. त्यानंतर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने देखील याविरोधात भूमिका घेतली गेली. त्यानंतर प्राडा कंपनीने हे चप्पल कोल्हापुरी असल्याचं मान्य केलं. या कोल्हापुरी चप्पलबाबत करार करण्याविषयी सकारात्मकता दर्शवली. त्यानंतर प्राडा कंपनीची टीम आज (15 जुलै) कोल्हापुरात आली.
या कंपनीच्या दोन टीम येणार आहेत. त्यापैकी एक आज आलेली आणि दुसरी टीम ऑगस्टमध्ये येणार आहे. प्राडा कंपनीने आपली टीम कोल्हापूर चप्पल व्यवसायिकांच्या चर्चेला पाठवल्यामुळं नक्कीच जागतिक पातळीवर आता याची दाखल घेतली गेली हे सिद्ध झालं आहे.
( नक्की वाचा: Kolhapuri Chappal : कोल्हापुरी चप्पलवरून सोशल मीडियावर राडा, लग्झरी ब्रँडवर का संतापले नेटीझन्स? )
काय दिला सल्ला?
कोल्हापुरातील सुभाषगर याठिकाणच्या टिपटॉप फुटवेअर आणी इतरही काही व्यावसायिक कारागीरांना प्राडाच्या टीमने भेट दिली. ही भेट दिल्यानंतर टीमने कारागीर आणि इतरांशी संवाद साधला. व्यावसायिक रोहीत गावळी यांनी या टीमशी संवाद साधला. यावेळी त्यांनी साधलेल्या संवादनुसार, प्राडा टीमने या चप्पलच्या मटेरियल, कारागीर आणि नवीन व्हरायटीबाबत माहिती घेतली. विशेष म्हणजे नवीन एका चप्पलबाबत आवर्जून माहिती घेतली.
काही चप्पलचे नमुने या कारागीरांना भेट देण्यात आले. या टीमने हे चप्पल आवडल्याचही सांगितलं. प्राडाने दाखवलेली चप्पल आणि कोल्हापुरी चप्पल याबाबत माहिती दिली. ही भेट झाल्यानंतर कोल्हापुरी चप्पल प्राडा कंपनीने खरेदी करावी आणि जगभर पोहचावी अशी अपेक्षा कारागीर आणि व्यावसायिक वर्गाने देखील व्यक्त केली.