राकेश गुडेकर, रत्नागिरी:
Dapoli girl shines in US Army: रत्नागिरी जिल्ह्याच्या मातीतील कन्या, दापोलीची प्राजक्ता भांबुरे-बोंगाळे यांनी जागतिक स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अमेरिकेच्या सैन्यदलात (US Army) निवड होणे, ही कोणत्याही भारतीय महिलेसाठी अभिमानाची गोष्ट आहे, आणि प्राजक्ताने ही किमया साधली आहे. आठ महिन्यांच्या अत्यंत खडतर आणि शारीरिक कस लावणाऱ्या प्रशिक्षणानंतर त्यांनी ही महत्त्वाची पदवी प्राप्त केली.
Shocking: 15 दिवसांपासून गुंगारा, पोलिसांना सापडेनात.. फरार माजी आमदार विधान भवनात दिसले!
कोकण कन्येची यशस्वी झेप
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील प्राजक्ता भांबुरे-बोंगाळे (सारा बोंगाळे) यांनी अमेरिकेच्या सैन्यदलात निवड होऊन कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अमेरिकन सैन्याच्या अत्यंत कठीण आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक आठ महिन्यांच्या प्रशिक्षणाला यशस्वीरीत्या पूर्ण करत त्यांनी अधिकृत पदवी प्राप्त केली. सध्या त्या अमेरिकन सैन्यदलाच्या मेडिकल विभागात सेवा बजावत आहेत.
या प्रशिक्षणादरम्यान प्राजक्ताने उत्कृष्ट नेमबाजीचे कौशल्य दाखवत ‘मार्क्समनशिप' पदक पटकावलं. तसेच संपूर्ण प्रशिक्षण बॅचमध्ये सर्वाधिक शैक्षणिक गुण मिळवत त्यांनी आणखी एक मानाचा बहुमान मिळवला. प्राजक्ताचे शालेय शिक्षण दापोलीतील ए. जी. हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातून बी.एस्सी. आणि मुंबईतील रूपारेल महाविद्यालयातून एंडोक्रिनॉलॉजी विषयात एम.एस्सी. पदवी त्यांनी संपादन केली.
दरम्यान, लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या प्राजक्ता यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यासोबतच करिअरच्या ध्येयाचा प्रवास न सोडता अमेरिकन सैन्यात मेडिकल विभागात सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या यशाने कोकणच्या मुलींचे मनोबल उंचावले आहे. कोकण कन्येच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विना HSRP वाहनांची आता खैर नाही! RTO कडून किती दंड आकारला जाणार?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world