Preventing child marriage : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यभरात विवाह सोहळे आयोजित केले जातात. मात्र काही भागात विवाहसोहळ्यात उमलणाऱ्या कळ्या खुडायचं दुष्कृत्य केलं जातं. शिकायला, खेळायच्या वयात मुलींना बोहल्यावर चढवलं जातं. हे रोखण्यासाठी महिला बाल विकास विभाग अलर्टवर आलं आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर विवाह सोहळे आयोजित केले जात असून या मुहूर्तावर बालविवाह मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यासंदर्भात एका बैठकीच आयोजन करण्यात आलं. या बैठकीत महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे, सह आयुक्त राहुल मोरे व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी यांना मंत्री मेघना बोर्डीकर यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
नक्की वाचा - देवाच्या धावा करतानाच मंदिरातील भिंत कोसळली, 8 भाविकांचा मृत्यू, जखमींची संख्या चिंता वाढवणारी
निर्मल भवन येथे अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर बालविवाह रोखणेबाबत कारवाई करण्यासंबंधित बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार 18 वर्षांखालील मुली आणि 21 वर्षांखालील मुलांचे विवाह करणे बेकायदेशीर आहे. परंतु आजही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह होतांना दिसतात. गावपातळीवर ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, पोलीस प्रशासन, महिला व बाल विकास अधिकारी यांनी विशेष लक्ष ठेवून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.
परभणीत विशेष मोहीम...
राज्यातील ग्रामीण भागामध्ये बालविवाह होत असल्याचं दिसून येतं. त्यातही परभणी जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक दिसून येते, त्यामुळे येथे विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी सूचना दिल्या आहेत.