रेवती हिंगवे, पुणे: भारत- पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थितीत जगभरातून भारताला मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र, पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारतीय व्यापाऱ्यांनी धक्का दिला आहे. तुर्कीच्या सफरचंदांवर बॅन तुर्की म्हणत व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे तुर्की सफरचंद बाजारातून गायब झाली आहेत. इराणमधून येणाऱ्या सफरचंदांचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारात 10 किलो सफरचंदामागे 200 ते 300 रुपये, तर किरकोळ बाजारात प्रति किलो 20 ते 30 रुपये दराने वाढ झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंदाऐवजी इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझलँड सफरचंदाला पसंती दिली आहे. इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझलँड सफरचंदाच्या भावात पेटीमागे 200 ते 300 रूपयांची वाढ झाली असल्याची माहिती मार्केट यार्डातील सफरचंदाचे आडतदार, श्री गुरुदेव दत्त फ्रूट एजन्सीचे सत्यजित झेंडे यांनी दिली. मार्केट यार्डात देशासह परदेशातून सफरचंदाची आवक होत असते.
दुसरीकडे, तुर्कीहून होणाऱ्या सफरचंद आयातीवर तात्काळ पूर्ण बंदी घाला, अशी मोठी मागणी हिमाचलच्या शेतकऱ्यांनी केली आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड यांसारख्या हिमालयीन राज्यांमधील सफरचंद उत्पादक शेतकरी सध्या तुर्कीमधून होणाऱ्या प्रचंड सफरचंद आयातीतून निर्माण झालेल्या संकटाला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर हजारो शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
(नक्की वाचा - India vs Pakistan : भारताची पंगा घेऊन पाकिस्तानवर कर्ज घेऊनही भीक मागायची वेळ! किती झालं नुकसान?)
काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?
1. तुर्कीहून होणाऱ्या सफरचंद आयातीवर तात्काळ पूर्ण बंदी घालावी.
2. अन्य देशांतील सफरचंद आयातीवर ‘किमान आयात मूल्य' (MIP) निश्चित करावे.
3. स्थानिक सफरचंद उद्योगांना सहकार्य करण्यासाठी आर्थिक पॅकेज द्यावे.
4. बागायती राज्यांमधील सफरचंद उत्पादन व वितरणासाठी स्वतंत्र धोरण राबवावे.
5. स्थानिक सफरचंद उत्पादकांसाठी हमीभाव, भांडवली सहाय्य आणि निर्यात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.