अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:
Pune Bangladeshi Girls Escape: पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील हडपसर, महंमदवाडी रोडवरील 'रेस्क्यू फाउंडेशन' मधून १३ बांगलादेशी मुलींनी केअरटेकर आणि सुरक्षारक्षकावर हल्ला करून पलायन केल्याची घटना घडली आहे. केअर टेकरवर हल्ला करत तिच्या तोंडात बोळा कोंबून बांधून ठेवून या मुलींनी पळ काढला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पळ काढलेल्या मुलींचा शोध सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
महंमदवाडी रोडवरील 'रेस्क्यू फाउंडेशनमधून 13 बांगलादेशी मुलींनी पळ काढल्याने खळबळ उडाली आहे. पळ काढण्यासाठी या मुलींनी धक्कादायक प्लॅनिंग केले. एका बांगलादेशी मुलीने औषध घेण्याच्या बहाण्याने संस्थेच्या केअरटेकर लक्ष्मी कांबळे यांना दरवाजा उघडण्यास सांगितले. दरवाजा उघडताच आणखी चार मुलींनी केअरटेकर कांबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, त्यांच्या तोंडात बोळा कोंबून हातपाय बांधून ठेवत वैद्यकीय कक्षात कोंडले.
दुसरीकडे, साफसफाई करताना सुरक्षारक्षकाकडून मुख्य दरवाजा चुकून उघडा राहिला. याचाच फायदा घेत या 13 मुलींनी सुरक्षा रक्षकावरही हल्ला करत त्याला चाव घेत पळ काढला. याबाबतची माहिती मिळताच संस्थेकडून तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी तात्काळ सुत्रे हलवत सय्यदनगर आणि हडपसर भागात शोध घेत त्यापैकी 2 महिलांना ताब्यात घेतले आहे. मात्र उर्वरित 11 जणी अद्याप बेपत्ता आहेत.
Pune News: पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला मारहाण, Video होतोय Viral
रेस्क्यू फाउंडेशन ही संस्था मानवी तस्करीतून वाचवलेल्या महिला आणि मुलींसाठी काम करते. याआधी संस्थेला पोलिसांचे संरक्षण होते, मात्र 16 मार्च 2024 मध्ये पोलिसांचे संरक्षण काढून घेण्यात आले. संस्थेकडून संरक्षणाची मागणी करत पोलीस आयुक्तांकडे पाठपुरावा करण्यात आला होता, मात्र पुन्हा संरक्षण देण्यात आले नाही.
महत्त्वाचं म्हणजे या संस्थेमध्ये सध्या क्षमतेपेक्षा जास्त महिला राहतात. पलायन केलेल्या बांगलादेशी मुलींच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया संथ असल्याने या मुली नैराश्यात जातात. त्यातूनच त्या सा प्रकारचे पाऊल उचलतात. सध्या संस्था सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांच्या मदतीने बेपत्ता मुलींचा शोध घेत आहे. काळेपडळ पोलिसांकडून 11 मुलींचा शोध सुरू आहे.