यशपाल सोनकांबळे, पुणे:
Pune Minor Girl Missing Case: अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराच्या घटनांनी पुणे जिल्हा हादरुन गेला आहे. नसरापूरमधील चिमुकलीचे अत्याचार आणि हत्या प्रकरण ताजे असतानाच पुण्यात आजोबानेच नातीचे शोषण केल्याचे समोर आले आहे. एकीकडे अत्याचार प्रकरणे वाढत असतानाच पुण्यात दोन दिवसात सहा अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, दोन दिवसांत सहा अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. बेपत्ता झालेल्या सर्व मुली १५ ते १७ वयोगटातील असून, त्यांना फूस लावून पळवून नेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी नरे, वानवडी, हडपसर यांसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुण्यात सहा अल्पवयीन मुली बेपत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, नरे परिसरातून एकाच वेळी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यांना कोणीतरी अज्ञाताने अज्ञात कारणासांठी पळवून नेल्याची तक्रार पालकांनी दिली आहे. वानवडीमध्ये साडेसतरा वर्षांच्या मुलीचे अपहरण झाले असून, हडपसरमध्येही १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेले आहे. तसेच फुरसुंगी आणि वाघोली परिसरातूनही अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटनांची नोंद झाली आहे.
सलग घडणाऱ्या या घटनांमुळे पालकांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने छडा लावावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. पुणे पोलिसांनी या सहाही प्रकरणांचा समांतर तपास सुरू केला असून, बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. सोशल मीडिया आणि मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून आरोपींपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पुण्यात आणखी एक अत्याचाराची घटना
हवेली तालुक्यातील सोरतापवाडी परिसरात एका नर्सरीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आकाश रामहरी ओव्हाळ आणि अभिजीत खंडागळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होते. घटनेच्या दिवशी नराधमांनी तरुणीला निर्जन स्थळी मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला ओढून नेले आणि तिच्या अत्याचार केला.